आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिर्डी - देशातील दुस-या क्रमांकाचे श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणा-या साई संस्थानची श्रीमंती दिवसेंदिवस डोळे दिपवून टाकणारी ठरत आहे. आजमितीला संस्थानच्या नावावर दीड हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेसह 3200 किलो चांदी आणि 300 किलो सोने जमा आहे. सुमारे 850 कोटी रुपये विविध राष्ट्रीयीकृत बॅँकांमध्ये ठेवीच्या रूपात सुरक्षित आहेत.
सोन्याने मढवलेल्या कळसापासून सुवर्णसिंहासनावर आरूढ सार्इंच्या संस्थानच्या संपत्तीबाबत ‘दिव्य मराठी’ने मिळविलेल्या माहितीनुसार स्थावर मालमत्ता 1500 कोटी रुपये आहे. सध्याचा बाजारभाव गृहीत धरला तर ही संपत्ती पाच पटीने वाढू शकते. इतकेच नाही तर देणग्या, दर्शन शुल्क, प्रसाद, भक्तनिवास यातून मिळालेल्या उत्पन्नाचा विनियोग संस्थानने कल्पकतेने केलेला दिसतो. दानपेटीत जमा रक्कमही मोठी आहे. आजचा भाव विचारात घेतल्यास संस्थानकडील सोने कोटींच्या घरात जाईल.
सशुल्क दर्शनामुळे ठोक उत्पन्न
संस्थानला दानपेटीव्यतिरिक्त शनिवार व रविवारी सशुल्क दर्शन व्यवस्थेमुळे ठोक उत्पन्न मिळते. संस्थानने 22 कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या साईटेक प्रकल्पाद्वारे दिले जाणारे ऑ नलाइन दर्शन, भक्तनिवासातून मिळणा-या उत्पन्नाची आकडेवारी काहीशी गुंतागुंतीची आहे. माहितीनुसार 13 मार्च 2010 पासून सुरू झालेल्या दर्शन सुविधेचा लाभ आजपर्यंत 3 लाख 10 हजार भाविकांनी घेतला. त्यातून 12 कोटी 25 लाख 57 हजार 600 रुपये उत्पन्न मिळाले. दर आठवड्यातील एका दिवसाच्या उत्पन्नाचा विचार करता रोज 4 लाखावर रक्कम सशुल्क दर्शनातून संस्थानला मिळते. याशिवाय 14 जुलै 2011 पासून संस्थानने साईटेक प्रकल्प कार्यान्वित केला. त्या माध्यमातून जगभरातील सात लाख साईभक्तांनी साईसमाधीचे ऑ नलाइन दर्शन घेतले. त्यातून आजपर्यत सात कोटी 16 लाख रुपये इतके उत्पन्न दानपेटीत जमले.
संपत्तीचा विनियोग साईभक्तांसाठी
संस्थानकडे आज कोट्यवधींची संपत्ती, सोने, चांदी, मौल्यवान वस्तू दान म्हणून आलेल्या आहेत. 3200 किलो चांदी, 300 किलो सोने, 850 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. या संपत्तीचा विनियोग साईभक्तांसाठीच होत आहे. त्यातून विविध समाजोपयोगी कामे के ली जात आहेत.’’
डॉ. यशवंतराव माने, उपकार्यकारी अधिकारी,साई संस्थान, शिर्डी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.