आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘साईकृपा’च्या मालमत्तेची विक्री करून शेतकऱ्यांना देणार रक्कम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - साईकृपा साखर कारखान्याची विक्री करून ऊस उत्पादकांची थकलेली ३८ कोटींची देयके मिळण्याच्या मागणीसाठी साईकृपा साखर कारखाना हिरडगाव शोषित शेतकरी आंदोलनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले उपोषण सहाव्या दिवशी सुटले. जिल्हाधिकारी, ऊस उत्पादक शेतकरी, साखर आयुक्त कार्यालय, पंजाब नॅशनल बँक साईकृपा साखर कारखान्याचे अधिकारी यांच्यात झालेल्या संयुक्त बैठकीत पंजाब नॅशनल बँकेने कारखान्याची मालमत्ता विकून येणाऱ्या पैशांची पहिली रक्कम शेतकऱ्यांना देण्याचे कबूल केले. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी डिसेंबरअखेर शेतकऱ्यांना व्याजासह पैसे मिळण्याची खात्री दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.
उच्च न्यायालयाने २५ जुलै रोजी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या मालकीच्या साईकृपा साखर कारखान्याच्या (हिरडगाव, ता. श्रीगोंदे) विक्रीची स्थगिती उठवून कारखान्याच्या विक्रीद्वारे ऊस उत्पादकांची थकलेली देयके देण्याचा निर्णय दिला असताना शेतकऱ्यांना अद्यापि देयके मिळालेली नाहीत. प्रशासनाकडून देयके मिळण्यासंदर्भात अनेक आश्वासने मिळूनही कार्यवाही होत नसल्याने कारखान्याची विक्री करून तातडीने थकीत देयके देण्याच्या मागणीसाठी १९ ऑक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले होते.

या उपोषणाची दखल घेत जिल्हाधिकारी कवडे यांनी संयुक्त बैठक बोलवली. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, तहसीलदार वंदना खरमाळे, पंजाब नॅशनल बँकेचे अनुप कुमार, साईकृपा साखर कारखान्याचे कैलास जरे, एच. आर. मुंडे, चंद्रकांत गुंगे, शोषित शेतकरी आंदोलनाचे अध्यक्ष राजेंद्र देवगावकर, बाबा आरगडे, विधी सल्लागार अॅड. कारभारी गवळी, देविदास कदम, सतीश होले, दत्तू होले, श्रीरंग करांडे, सीताराम काळे, दरीअप्पा आंधळकर, बापूराव धुमाळ, नारायण जगदाळे आदी बैठकीस उपस्थित होते. बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने आरगडे अॅड. गवळी यांनी उपोषणकर्त्यांना चहा पाजून उपोषण सोडवले.

साईकृपा कारखान्याकडे पंजाब नॅशनल बँकेची २८० कोटींची थकबाकी अाहे. बँकेने कारखान्याची जप्ती मोहीम सुरू केली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ३८ कोटींची देयकेही थकीत आहेत. बँकेने कारखान्याचा रांजणगाव एमआयडीसी येथील ४७ कोटींच्या भूखंडाची विक्री करून येणारी रक्कम शेतकऱ्यांना देण्याचे कबूल केले. इतर विविध बँकेत कारखान्याची अडीच कोटी असलेली अनामत रक्कम पंजाब नॅशनल बँकेत वर्ग करण्याची कार्यवाही सुरू आहे. कारखान्याच्या मालमत्ता विक्रीचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यासाठी आंदोलनाच्या वतीने साखर आयुक्तांबरोबर बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती अॅड. गवळी यांनी दिली. कारखान्याकडे थकलेल्या पैशांमुळे या वर्षी दिवाळी साजरी करता येणार नसल्याने शेतकऱ्यांनी बबनराव पाचपुते यांचा निषेध केला.

बातम्या आणखी आहेत...