आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"साईराम सोसायटी'ला मिळेनात नागरी सुविधा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर-कल्याण महामार्गावरील साईराम सोसायटीमधील नागरिक गेल्या चार वर्षांपासून नागरी सुविधांच्या प्रतीक्षेत आहेत. महापािलका प्रशासन व नगरसेवकांनी दुर्लक्ष केल्याने तेथील सुमारे पाचशे कुटुंबे निर्वासित जीणे जगत आहेत. रस्त्यांच्या डागडुजीसाठी त्यांना लोकवर्गणी करावी लागली.

उपनगरांचा विकास अनेक वर्षांपासून खुंटला आहे. त्यात केडगाव, मुकुंदनगर, नागापूर-बोल्हेगावचा समावेश आहे. साईराम सोसायटी व आजूबाजूच्या परिसरातील नागरी सुविधाही कोलमडल्या आहेत. पाच-सहा दिवसांनंतर मिळणारे पिण्याचे पाणी, काळ्या मातीचे रस्ते, तुंबलेले गटार व ड्रेनेज, वाढलेले खुरटे गवत, साचलेला कचरा यासारख्या समस्यांनी नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. स्थानिक नगरसेवक, प्रशासन, महापौर यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही येथील एकही समस्या सुटलेली नाही. स्थानिक नगरसेवक निवडणुकीनंतर या भागात फिरकलेदेखील नाहीत.

पावसामुळे रस्त्यांचा बोजवारा उडाला आहे. रस्त्यांवर डांबर तर दूरच, साधी खडीदेखील टाकलेली नाही. त्यामुळे घराबाहेर पडताच गुडघाभर चिखलाचा सामना करावा लागतो. वाहने तर घरीच उभी करावी लागतात. कामािनमित्त जायचे असेल, तर रिक्षानेच जावे लागते. कमीत कमी पायी चालता येईल असा तरी रस्ता असावा, यासाठी नागरिकांनी लोकवर्गणी करून रस्त्यावर आवश्यक तेथे मुरूम टाकला आहे.

नियमित कर भरूनही सापत्न वागणूक मिळत असल्याने नागरिक नगरसेवक व प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त करत आहेत, जर मूलभूत सुविधाच मिळत नसतील, तर महापालिका हद्दीत राहून काय फायदा, अशी नागरिकांची मानसिकता झाली आहे. केवळ साईराम सोसायटीच नाही, तर परिसरातील शिवाजीनगर, विद्यानगर या भागातही अद्याप नागरी सुविधा पोहोचलेल्या नाहीत.
लोकवर्गणीतून कामे
सांडपाणी विल्हेवाटीसाठी कोणतीच उपाययोजना नाही. सर्व गटारे व ड्रेनेज तुंबले आहेत. दहा वर्षांपासून या भागात राहतो, परंतु महापािलकेने या ठिकाणी अद्याप एकही सुविधा दिलेली नाही. त्यामुळे आम्हाला लोकवर्गणीतून जमेल तेवढी कामे करावी लागतात.”
दादासाहेब फलके, नागरिक.
घरात राहणे कठीण झाले
परिसरात घंटागाडी येत नाही. त्यामुळे जागा मिळेल तेथे कचरा टाकावा लागतो. परिणामी मोकळ्या जागेत कचऱ्यांचे ढीग साचले असून मोठी दुर्गंधी सुटली आहे. पथदिवे नसल्याने दररोज अंधाराला तोंड द्यावे लागते. चिखल, वाढलेले खुरटे गवत यामुळे घरात राहणे कठीण झाले आहे.”
सुरेखा बिडकर, गृहिणी.
सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न बिकट
ठिकठिकाणी पडलेले कचऱ्याचे ढीग व वाढलेल्या खुरट्या गवतामुळे परिसरात डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मनपाकडून अद्याप एकदाही औषध फवारणी झालेली नाही. परिसरातील नगरसेवक नागरिकांना केवळ आश्वासने देतात, प्रत्यक्षात काम मात्र काहीच करत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.”
मोहनलाल श्रीवास्तव, नागरिक.