नगर- माध्यमिक शिक्षण विभागाच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाची चौकशी करावी, या मागणीसाठी जिल्हा मागासवर्गीय ओबीसी अल्पसंख्याक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघाने सोमवारी घंटानाद आंदोलन केले.
वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालयात गैरकारभार होतो. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांबाबत सातत्याने गैरमार्गांचा अवलंब केला जातो. माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची ना परतावा कर्जप्रकरणी वैद्यकीय बिले, रजा कालावधीतील बिले मिळावीत, अंतिम फंडाची अग्रीम देताना हेतूपुरस्सर होणाऱ्या कारभाराची चौकशी व्हावी, ठरावीक शिक्षकांनाच वेतन अदा केल्याची चौकशी करावी, फंडाच्या प्रलंबित पावत्या द्याव्यात यासह विविध मागण्या आंदोलकांनी लावून धरल्या आहेत. या मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना यापूर्वीच दिले होते. तथापि, समाधानकारक तोडगा न निघाल्याने घंटानाद करण्यात आला. यावेळी रवींद्र पटेकर, विलास साठे, सोन्याबापू कुसळे आदी उपस्थित होते. वेतन पथकातील कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या करून त्यांची खातेनिहाय चौकशी करावी, पगारातील विलंब कमी करणे, बऱ्याचदा ठरावीक शाळांचे नियमित वेतन देयके तथा फरक बिले गहाळ केली जातात, पण ठरावीक व्यक्तींनाच बिले दिली जातात, अशा संतप्त प्रतिक्रिया आंदोलकांनी व्यक्त केल्या. या प्रकरणी प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.