नगर - देशाच्या विकासासाठी कर आवश्यक असल्यामुळे करदात्यांचा सन्मान झाला पाहिजे, देशाच्या विकासात करदात्याचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राम शिंदे यांनी केले.
विक्रीकर विभागामार्फत विक्रीकर दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे, विक्रीकर उपायुक्त जितेंद्र पाटील, विक्रीकर उपायुक्त राजेश गणेर, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सतीश भांबरे यांच्यासह विक्रीकर विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री शिंदे म्हणाले, राज्य शासनाला विक्री कराच्या माध्यमातून महसूल मिळत आहे. देशाच्या विकासासाठी कर आवश्यक आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कल्पनेतून राज्यभरात हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. ही कौतुकास्पद बाब आहे. आपण शासनाकडे कर रुपात दिलेल्या पैशाचा चांगल्या प्रकारे उपयोग झाला पाहिजे. ही प्रत्येक करदात्या नागरिकांची इच्छा असते. शासन यासंदर्भात नियोजनबध्द काम करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी कवडे म्हणाले, माहिती तंत्रज्ञानाची कास धरून प्रशासन गतीने काम करीत आहे. त्याचा उपयोग करदात्याला होईल. सर्व प्रणालीत सुलभता आणण्यासाठी राज्याच्या विकासासाठी योगदान द्यावे.