आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष परकाळेंसह १३ अटकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - गृहराज्यमंत्रीतथा पालकमंत्री राम शिंदे यांच्या संपर्क कार्यालयावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांच्यासह १३ जणांना शुक्रवारी अटक करण्यात आली. अटकेतील आरोपींची संख्या आता १५ झाली आहे.

पालकमंत्री शिंदे यांच्या नगर येथील संपर्क कार्यालयावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी १८ ऑगस्टला हल्ला केला होता. कार्यालयाच्या काचा फर्निचरची मोडतोड करण्यात आली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर झालेल्या पुरस्काराचा निषेध करणारी धमकीवजा पत्रकेही टाकण्यात आली होती.

राजेश गणपत परकाळे (चिचोंडी पाटील, नगर), कृष्ण ऊर्फ आदिनाथ सावंत (तपनेश्वर गल्ली, जामखेड), गणेश प्रल्हाद गायकवाड (सातभाई मळा, दिल्ली गेट), मयूर शंकर पवार ( चिचोंडी पाटील), संजय काशिनाथ वाघ (शेवगाव), आकाश कचेश्वर बोऱ्हाडे (नालेगाव), राजेश्वर परमेश्वर चव्हाण (तपनेश्वर गल्ली, जामखेड), कैलास गोविंद वाडेकर, कानिफनाथ अर्जुन जपकर, सदाम सैरामिया सय्यद (तिघेही चिचोंडी पाटील), दत्तात्रय निवृत्ती साठे (बोरुडे मळा, नगर), राहुल तात्यासाहेब नवले (कोळेवाडी, ता. कर्जत), अरविंद रावसाहेब गेरगे (इसळक निंबळक, नगर) अशी शुक्रवारी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांच्यासह तेरा जण शुक्रवारी सकाळी माळीवाडा बसस्थानकाजवळच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जमले होते. कोतवाली पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर कोतवाली पोलिस ठाण्यात जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला. त्यांना तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. शनिवारी (२२ ऑगस्ट) दुपारी या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.