आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपदा पतसंस्था गैरव्यवहार: महिनाअखेर लेखापरीक्षण अहवाल सादर होणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- बहुचर्चित संपदा पतसंस्थेच्या लेखापरीक्षणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून महिनाअखेरीस अहवाल जिल्हा उपनिबंधकांकडे सादर होणार आहे.

संस्थापक संचालक ज्ञानदेव वाफारे व व्यवस्थापकाला झालेली अटक, तसेच पोलिस कारवाईत अडकलेल्या कागदपत्रांमुळे संपदा पतसंस्थेच्या तेरा शाखांचे 2010-11 व 2011-12 या दोन वर्षांचे लेखापरीक्षण प्रलंबित होते. प्रशासक मंडळ व लेखापरीक्षकांकडून या कामाला गती देण्यात आली आहे. लेखापरीक्षक डी. एम. बारस्कर यांच्याकडून लेखापरीक्षणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून 31 जानेवारीच्या आत अहवाल जिल्हा उपनिबंधकांकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासक लक्ष्मण बुरा यांनी दिली आहे. विनातारण कर्जदार, मोठे थकबाकीदार यांना नोटिसा बजावून त्यांचे म्हणणे घेण्याचे काम संपले आहे, तर तत्कालीन संचालक मंडळांना म्हणणे मांडण्याच्या नोटिसा बजावण्याची कारवाई सुरू आहे.

गेल्या पावणेदोन वर्षांपासून या पतसंस्थेतील गैरव्यवहार गाजत आहेत. मात्र, अद्यापपर्यंत संस्थेचे ठेवीदार व कर्जदार यांची निश्चित माहिती समोर आलेली नव्हती. लेखापरीक्षण अहवालातून ही माहिती समोर येणार आहे. सुमारे साडेसतरा हजार ठेवीदारांचे 32 कोटी रुपये या पतसंस्थेत अडकल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.

तत्कालीन प्रशासक पांडुरंग गायकवाड, धनंजय गटणे व वसंत गांधी यांच्या चौकशीचा अहवाल फिरते लेखापरीक्षक बी. व्ही. धावारे यांनी यापूर्वीच उपनिबंधकांना सादर केला आहे. विशिष्ट कलमान्वये चौकशी झाली नसल्याने संबंधितांवर कारवाई करता येणार नसल्याचे धावारे यांनी चौकशी अहवालातच नमूद केले आहे. सध्या सुरू असलेल्या लेखापरीक्षणातून तत्कालीन प्रशासकांच्या कार्यकालात गैरव्यवहार झाल्याचे आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई होण्याची शक्यता आहे.

2009-10च्या लेखापरीक्षण अहवालावरून संचालक मंडळावर मे 2011 मध्ये कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर वाफारेसह इतर संचालकांवर अटकेची कारवाई झाली. दोन वर्षांच्या लेखापरीक्षणात दोषी आढळल्यास संचालक मंडळाला पुन्हा फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.