आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sampada Co Operative Society Bank Investor Issue Nagar

‘संपदा’च्या ठेवीदारांचा वाफारेच्या घरावर हल्लाबोल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - बहुचर्चित संपदा पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या संतापाचा उद्रेक बुधवारी झाला. संस्थेचा संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेव वाफारे याची पत्नी व संस्थेची तत्कालीन संचालक सुजाता वाफारेच्या सावेडीतील घराला ठेवीदारांनी टाळे लावले. घोषणाबाजी करत खिडक्यांच्या काचाही फोडण्यात आल्या.

गेल्या अडीच वर्षांपासून संपदाच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवीतील एक पैसाही परत मिळालेला नाही. ठेव परतीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. कोणत्याही यंत्रणेमार्फत न्याय मिळत नसल्याची भावना ठेवीदारांमध्ये निर्माण झाली आहे. सन 2010-11 व 11-12 या दोन वर्षांच्या लेखापरीक्षणात 11 कोटी 40 लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. कोतवाली पोलिस पडताळणीच्या नावाखाली लेखापरीक्षक डी. एम. बारस्कर यांची फिर्याद घेत नसल्याने ठेवीदार संतापले. यासंदर्भात विचारविनिमय करून जिल्हाधिकार्‍यांना भेटण्यासाठी ठेवीदार बचाव कृती समितीच्या आवाहनानुसार ठेवीदार बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र झाले. जिल्हाधिकारी उपस्थित नसल्याने चर्चा करून ठेवीदारांनी सुजाता वाफारेचे सावेडीतील घर गाठले. जोरदार घोषणाबाजी करत घराला टाळे ठोकण्यात आले. संतप्त ठेवीदारांनी खिडक्यांच्या काचा फोडल्या. घराच्या बाहेर लावण्यात आलेल्या वाहनांच्या चाकातील हवा सोडण्यात आली. संस्थेतील गैरव्यवहाराला जबाबदार असणार्‍यांच्या विरोधात असेच आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार ठेवीदारांनी या वेळी केला.