आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sampada Co Operative Society Depositor Meet Tomorrow Aanna Hajare

‘संपदा’चे ठेवीदार उद्या अण्णा हजारे यांच्या भेटीला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- बहुचर्चित संपदा पतसंस्थेचे ठेवीदार शुक्रवारी (27 डिसेंबर) सकाळी साडेअकरा वाजता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेणार आहेत. गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकीय यंत्रणांचे उंबरठे झिजवूनही ठेवीदारांच्या हातात एक छदामही पडलेला नाही. शेवटी अण्णांचे मार्गदर्शन व मदत घेण्यासाठी ठेवीदारांनी राळेगणसिद्धीची वाट धरली आहे.
नगर व पारनेर तालुक्यातील 20 हजार ठेवीदारांच्या जवळपास 32 कोटी रुपयांच्या ठेवी संपदा पतसंस्थेत अडकल्या आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ठेवीदार ठेवींच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा पोलिस अधीक्षक अशा सर्व प्रशासकीय यंत्रणांचे उंबरठे ठेवीदारांनी गेल्या तीन वर्षांत झिजवले आहेत. सन 2009-10 च्या आर्थिक लेखापरीक्षणात संस्थेत साडेतेरा कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले. मात्र, संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यास वर्षभराचा विलंब करण्यात आला.
सन 2009-10 च्या लेखापरीक्षणात उघड झालेल्या गैरव्यवहारांबाबत ऑगस्ट 2011 मध्ये तत्कालीन संचालक मंडळ व व्यवस्थापकांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संस्थेचा संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेव वाफारेसह इतरांनाही अटक झाली. तपास करून पोलिसांनी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तत्पूर्वी जानेवारी 2011 पासूनच मुदत संपलेल्या ठेवी ठेवीदारांना परत मिळत नव्हत्या.
फौजदारी कारवाईनंतर संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली. मात्र, सुरुवातीच्या प्रशासक मंडळाने तत्कालीन संचालक मंडळाप्रमाणेच गैरव्यवहार केले. यासंदर्भातील चौकशी अहवाल उपनिबंधकांकडे सादर होऊन वर्षभराचा कालावधी उलटला तरी कोणतीही कारवाई झाली नाही.
सन 2010-11 व 11-12 चे लेखापरीक्षण करून घेण्यासाठी ठेवीदारांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्याचा अहवाल सादर होऊन दहा महिने उलटले आहेत. दोन वर्षांच्या लेखापरीक्षणात सुरुवातीला सव्वाअकरा कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र, त्यानंतर हा गैरव्यवहार पन्नास टक्क्यांनी कमी झाल्याचे दाखवण्यात आले. यासंदर्भात स्वतंत्र फिर्याद घेण्यास कोतवाली पोलिसांनी नकार दिला. ऑगस्ट 2011 मध्ये दाखल गुन्ह्यात दोन वर्षांतील लेखापरीक्षणात निष्पन्न साडेसहा कोटींच्या गैरव्यवहाराचा समावेश करण्याची खेळी करण्यात आली. त्यामुळे स्वतंत्र गुन्ह्यात अटक होण्याची तत्कालीन संचालक मंडळावरील नामुष्की टळली.
संस्था रसातळाला नेणार्‍या दोषी संचालक मंडळाच्या मालमत्तेवर टाच आणण्याची मागणी ठेवीदारांकडून सातत्याने होत आहे. मात्र, यात प्रगती झाली नाही. सन 2012-13 या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण अजून झालेले नाही. बड्या कर्जदारांकडून वसुलीची कार्यवाही गोगलगाईच्या गतीने सुरू आहे. सोने तारण कर्जाचा विषय बासनात गुंडाळून ठेवण्यात आला आहे. प्रशासकीय यंत्रणांकडून दुर्लक्ष होत असल्याने शेवटी ठेवीदारांनी अण्णांच्या मार्गदर्शनाखाली लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ठेवीदार हजारे यांची भेट घेणार आहेत.
दोनशे कोटी संपले..
बुडीत पतसंस्थांमधील ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळवून देण्यासाठी यापूर्वी अण्णांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते. त्यांच्या आंदोलनानंतर सहकारी संस्थांमध्ये सुधारणा करण्याचे पाऊल सहकार खात्याने टाकले. बुडीत पतसंस्थांमधील ठेवीदारांना दिलासा देण्यासाठी दोनशे कोटींची तरतूद शासनाने केली होती. ही रक्कम संपल्याचे मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नगर दौर्‍यात सांगितले होते.
अण्णांमध्येच सार्मथ्य
संपदा पतसंस्था अखेरच्या घटका मोजत आहे. संस्था अवसायनात काढण्याचा निर्णय आणखी तीन महिने लांबणीवर पडला आहे. कोणत्याही चमत्काराने संस्था पूर्वपदावर येण्याची सुतराम शक्यता नाही. राजकीय पुढारी, मंत्री व गैरव्यवहाराचा पैसा याच्या बळावर संस्थेचा संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेव वाफारे ठेवीदारांची पिळवणूक करण्यात यशस्वी झाला आहे. संस्था अवसायनात निघाली, तरी ठेवीदारांच्या हाती काहीही पडलेले नाही. गैरकृत्य करणार्‍या वाफारेला ठेवीदारांपुढे उभे करण्याचे सार्मथ्य केवळ अण्णा हजारे यांच्यामध्येच आहे. त्यामुळेच सर्व ठेवीदारांनी शुक्रवारी सकाळी राळेगणसिद्धीला पोहोचावे.’’ अँड. नीळकंठ सोले, निमंत्रक, ठेवीदार बचाव कृती समिती.