आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘संपदा’च्या ठेवीदारांची राळेगणलाही निराशा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - जिल्हा प्रशासनाचे उंबरठे झिजवून थकलेले संपदा पतसंस्थेचे ठेवीदार मोठय़ा अपेक्षेने शुक्रवारी राळेगणसिद्धीला गेले. मात्र, ‘जनलोकपाल कुणीकडे अन् पतसंस्थेचा प्रश्न कुणीकडे, अशी कामे घेऊन माझ्याकडे येऊ नका’, अशा शब्दात सुनावत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ठेवीदारांची बोळवण केली, असा आरोप ठेवीदार बचाव कृती समितीचे अध्यक्ष अँड. नीलकंठ सोले यांनी केला. आगाऊ वेळ घेऊन गेलेल्या ठेवीदारांशी बोलण्यासही त्यांनी नकार दिला. त्यामुळे ठेवीदार निराश होऊन परतले.

जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक, पोलिस अधीक्षक अशा सर्वच यंत्रणाकडे खेटे मारूनही गेल्या तीन वर्षांपासून हक्काच्या ठेवी परत मिळत नसल्याने संपदा पतसंस्थेच्या ठेवीदारांनी अण्णांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी अण्णांची आगाऊ वेळही घेण्यात आली. अण्णांच्या यापूर्वीच्या आंदोलनामुळे जळगाव, धुळे, कोल्हापूर येथील विविध पतसंस्थांमध्ये ठेवी अडकलेल्या ठेवीदारांना दिलासा मिळाला आहे. सहकारातील अनिष्ठ प्रथांविरुद्ध व ठेवीदारांच्या हितासाठी अण्णांनी केलेल्या आंदोलनामुळे राज्य सरकारने सहकार कायद्यात सकारात्मक बदलही करण्याची भूमिका घेतली. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेऊन संपदाचे ठेवीदार शेवटी अण्णांना भेटून त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी शुक्रवारी सकाळी राळेगणसिद्धीला गेले. अण्णांच्याच राळेगणसिद्धीचा तालुका असलेला पारनेर व शेजारच्या नगर तालुका व शहरातील 20 हजार ठेवीदारांच्या 32 कोटी रुपयांच्या ठेवी संपदा पतसंस्थेत अडकल्या आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ठेव परतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करूनही ठेवीदारांना एक छदामही मिळालेला नाही. त्यामुळे मोठय़ा अपेक्षेने ठेवीदार राळेगणसिद्धीला गेले. दीडशे ते दोनशे ठेवीदारांनी प्रशिक्षण केंद्राजवळील खोलीबाहेर अण्णांना गाठले. ठेवीदारांकडून बुके व सत्कार स्वीकारल्यानंतर ठेव परतीसाठी मार्गदर्शन करण्याची विनंती ठेवीदारांकडून करण्यात आली. यावर अण्णांनी लोकपाल व पतसंस्था घोटाळ्याची तुलना करत असे विषय सांगू नका, असे सांगितले. गार्‍हाणे ऐकून घेण्याची विनंती ठेवीदारांनी केली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत अण्णा खोलीत निघून गेले. ठेवीदारांनी दोन तास ठिय्या दिला. मात्र, उपयोग झाला नाही. शेवटी कंटाळून निराश झालेले ठेवीदार परतल्याचे अँड. सोले यांनी सांगितले.

चार वर्षांतील फरक
ठेवी बुडवणार्‍या पतसंस्थांविरुद्ध अण्णांनी केलेल्या उपोषणामुळे सरकारने दोनशे कोटींची तरतूद केली, तर सहकार कायद्यात दुरुस्ती विधेयक आणले. चार वर्षांपूर्वी ज्यावर अण्णांनी आंदोलन केले, त्यालाच फालतू म्हटल्याने ठेवीदारांनी आश्चर्य व्यक्त केले.

15 जानेवारीला उपोषण
अण्णा हजारे यांच्या वर्तनाने ठेवीदार खचले आहेत. मात्र, ठेव परतीसाठी ठेवीदारांना स्वत:हून पुढाकार घ्यावा लागणार आहे. यासाठी 15 जानेवारीला जिल्हा उपनिबंधक कार्यालयापुढे ठेवीदार उपोषण करणार आहेत. तसेच संस्थापक वाफारे व दोषी संचालकांनी फसवणूक केल्याच्या फिर्यादी पोलिस ठाण्यात देण्यात येतील. पोलिसांनी तक्रारी न घेतल्यास न्यायालयात खासगी फिर्यादी दाखल करू.’’ अँड. नीळकंठ सोले, ठेवीदार बचाव कृती समिती.

निवेदनातील आशय
जिल्ह्याच्या सहकार चळवळीत संपदा पतसंस्था एक कलंक बनली आहे. संस्थापक व त्याचे संचालक मंडळ गेल्या तीन वर्षांपासून ठेवीदारांचे 32 कोटी रुपये देण्याचे टाळत आहे. दोषी संस्थापक वाफारे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यक्रमात भाषणे ठोकत आहे. सर्व प्रय} करूनही ठेवी परत मिळत नसल्याने अण्णा हजारे यांच्या हस्तक्षेपाची गरज आहे. हजारे यांच्याशिवाय ठेवीदारांना सध्या कोणीही वाली उरलेला नाही