आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘संपदा’चे ठेवीदार उच्च न्यायालयात जाणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय संपदा पतसंस्थेच्या ठेवीदारांनी घेतला आहे. येत्या आठवड्यात ही याचिका दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती कृती समितीचे अध्यक्ष अँड. नीलकंठ सोले यांनी मंगळवारी दिली.

संपदा ठेवीदारांच्या ठेवी मिळवण्याच्या दृष्टीने कृती आराखडा तयार करण्यासाठी लालटाकी येथे आयोजित बैठकीत अँड. सोले बोलत होते. अँड. शिवाजी डमाळे, अँड. बबनराव झावरे यांच्यासह ठेवीदार माणिक कळसकर, गणपतराव देशमुख, जनार्दन मंडलिक, भालचंद कोकाटे, दिलीप भट, शिवाजी मोकाटे, विजय लोहार, अंकुश कोकाटे, देवराम दळवी, माधुरी कडामकर व छबू लोंढे, सुरेश म्हस्के आदी यावेळी उपस्थित होते.

अँड. सोले म्हणाले, ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात, यासाठी सर्वानुमते उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. जिल्हाधिकारी, राज्य सरकार, सहकार आयुक्त, उपनिबंधक यांच्यासह लेखापरीक्षकाला प्रतिवादी करण्यात येणार आहे. ठेवीदारांनी ग्राहक मंचातही तक्रार दाखल करावी. संपदा पतसंस्थेत 25 कोटींच्या ठेवी अडकल्या आहेत. लेखा परीक्षणात पतसंस्थेत गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे, असे त्यांनी सांगितले.

अँड. डमाळे म्हणाले, संपदा पतसंस्थेच्या ज्ञानदेव वाफारेंसह संचालकांनी ठेवीदारांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे ठेवीदारांनी ग्राहक मंचात, तसेच सरकारकडे न जाता न्यायालयात फौजदारी दावा दाखल करावा, तरच ठेवीदारांना न्याय मिळेल. बेकायदेशीरपणे कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. गैरव्यवहार करणार्‍यांना संस्थाचालकांना सरकारचा आशीर्वाद आहे, असा आरोपही त्यांनी केला.

देशमुख यांचा पाठिंबा
काँग्रेसच्या सनियंत्रण समितीचे अध्यक्ष विनायक देशमुख व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी ठेवीदारांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. देशमुख म्हणाले, ठेवीदारांच्या ठेवी मिळाल्याच पाहिजेत. चुकीच्या गोष्टींना आपला कधीच पाठिंबा नसतो.

अण्णा हजारेंची भेट घेणार
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना संपदा पतसंस्थेतील गैरव्यवहारांबाबत माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी आपण याप्रश्नी राळेगणसिध्दी येथे ठेवीदारांचा मेळावा घेऊन प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले होते. लवकरच ठेवीदार अण्णांची भेट घेणार आहेत.