आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपदा घोटाळा गैरव्यवहार करणार्‍या ज्ञानदेव वाफारेच्या कृत्याची लाज वाटते..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- एकेकाळी आपला सहकारी असलेल्या ज्ञानदेव वाफारे याने संपदा पतसंस्थेत केलेल्या गैरव्यवहारांमुळे जिल्ह्यात पतसंस्था चळवळ बदनाम झाली. त्याच्या या कृत्याने ठेवीदारांसमोर बसण्याचीही लाज वाटते,
असे पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे म्हणाले.

रंगारगल्लीतील डॉ. महाले मंगल कार्यालयात शुक्रवारी झालेल्या संपदा ठेवीदारांच्या बैठकीत ते बोलत होते. वसंत लोढा, संजय झिंजे, अँड. नीळकंठ सोले, सुरेश म्हस्के आदींसह ठेवीदार मोठय़ा संख्येने यावेळी उपस्थित होते.

संपदा पतसंस्थेत ठेवी अडकल्याने गेल्या तीन वर्षांपासून ठेवीदार सैरभैर आहेत. मात्र, पतसंस्था फेडरेशन व जिल्हा स्थैर्यनिधीने कर्जवसुलीत लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याने ठेवीदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ठेवीदारांच्या बैठकीला पहिल्यांदाच हजेरी लावत फेडरेशनचे अध्यक्ष कोयटे यांनी ठोस मदतीचे आश्वासन दिले.

कोयटे म्हणाले, वाफारेने ठेवीदारांची केलेली फसवणूक चीड आणणारी आहे. फेडरेशनचा अध्यक्ष या नात्याने इतर पतसंस्था वाचवण्यासाठी प्रयत्न करणे हा माझ्या कर्तव्याचा भाग आहे. ठेव परतीसाठी कर्जदारांकडून वसुली करण्यास प्राधान्य द्यावे लागेल. त्यासाठी कृती कार्यक्रम आखण्यात येत आहे. ठेवीदारांनी हा कार्यक्रम राबवण्यासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे. सहकार खात्याच्या दुर्लक्षामुळे वसुली रखडली. मात्र, आता सहकार खात्याने कर्जदारांकडून वसुली करण्यास मंजुरी दिली आहे. बड्या कर्जदारांच्या स्थावर व जंगम मालमत्तेवर टाच आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वसुलीला सहकार्य न करणार्‍या कर्जदारांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करावे लागेल. शहरात ठिकठिकाणी बड्या कर्जदारांचे फलक व फोटो लावून त्यांची बदनामी करण्याचा प्रयोग राबवण्यात येईल. असे कडक धोरण घेण्याला सर्वोच्च न्यायालयानेही मान्यता दिली आहे. फेडरेशन, स्थैर्यनिधी, ठेवीदार व सहकार विभागाच्या संयुक्त प्रयत्नांतून वसुली करण्यात येणार असल्याचे कोयटे म्हणाले.

लोढा म्हणाले, संस्था अवसायनात काढण्याचा अंतरिम आदेश उपनिबंधकांनी दिला आहे. लवकरच तसा अंतिम आदेशही होईल. बड्या कर्जदारांकडून येत्या आठ दिवसांत वसुलीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. झिंजे म्हणाले, दोषी संचालकांना पाठीशी घालणार्‍या मंत्री बाळासाहेब थोरात यांना जाब विचारला जाईल. वाफारे मंत्र्यांसोबत आढळला, तर घेराव घालू.

दोषींना शासन व्हावे
ठेवीदारांना केवळ ठेवी परत करून भागणार नाही. संस्था बुडवणार्‍या दोषींना शिक्षा झालीच पाहिजे. तसे झाल्यास संस्था बुडवणार्‍या प्रवृत्तींना चाप बसेल. गैरव्यवहार करणार्‍यांना कडक शिक्षा करण्याची शिफारस शासनाकडे करण्याचे आश्वासन कोयटे यांनी दिले.

12 कोटींच्या वसुलीत सहकार्य
संस्थेच्या 32 कोटींपैकी 12 कोटींच्या कर्जाची वसुली करून देण्याची जबाबदारी फेडरेशन व स्थैर्यनिधीने स्वीकारली आहे. जिल्हा उपनिबंधकांनीही याला मान्यता दिली. ठेवी व कर्जवाटपाची वस्तुस्थिती तपासण्यात येणार आहे. कर्जापोटी दिलेल्या धनादेशावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

संपदा पतसंस्था ठेवीदारांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे. समवेत स्थैर्यनिधीचे जिल्हा उपाध्यक्ष वसंत लोढा, संजय झिंजे, अँड. नीळकंठ सोले.