आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाण्यामुळे रखडले वाळूचे लिलाव, साठवून ठेवलेल्या वाळूची चौपट दराने होतेय विक्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पावसामुळे नदीपात्रांमध्ये सध्या पाणी आहे. त्यामुळे वाळूसाठ्यांचे लिलाव रखडले असून त्याचा परिणाम बांधकामांवर झाला आहे. वाळू उपलब्ध होत नसल्यामुळे शहर जिल्ह्यातील बांधकामे थांबली आहेत. दुसरीकडे मात्र साठवून ठेवलेल्या वाळूची चौपट दराने विक्री केली जात आहे. 
 
महसूल विभागाला सर्वाधिक महसूल गौन खनिजाच्या वाळू लिलावातून मिळतो. त्यातही सर्वात जास्त महसूल वाळू लिलाव वाळू चोरीच्या दंडातून मिळतो. २०१६-१७ या वर्षासाठी श्रीरामपूर, संगमनेर, राहुरी, राहाता, श्रीगोंदे या तालुक्यातील प्रवरा, मुळा, घोड, भीमा, गोदावरी या नदीपात्रातील एकूण ७४ वाळूसाठ्यांचे आॅनलाइन लिलाव घेण्यात येणार होते. एकूण 4 लाख 8 हजार ५०६ ब्रास वाळूचा हा लिलाव होणार होता. यातून प्रशासनाला ६९ कोटींच्या महसुलाची अपेक्षा होती. मात्र, तब्बल नऊ वेळा लिलाव घेऊनही केवळ १८ साठ्यांचे लिलाव होऊ शकले. त्यातून प्रशासनाला 8 कोटी ६६ लाखांचा महसूल मिळाला होता. उर्वरित ५८ साठ्यांचे लिलाव झाले नाही. या साठ्यांची किंमत ५६ कोटी ४४ लाख होती. मात्र, लिलावाकडे व्यावसायिकांनी पाठ फिरवल्याने ५६ कोटी ४४ लाखांचा महसुलावर प्रशासनाला पाणी सोडावे लागले. २०१५-१६ मध्ये नेवासे, पारनेर, श्रीगोंदे, संगमनेर, अकोले, कर्जत, जामखेड, श्रीरामपूर, राहुरी, पाथर्डी, शेवगाव या तालुक्यांमधील एकूण ६४ साठ्यांचे लिलाव घेण्यात येणार होते. मात्र, त्यापैकी केवळ १९ साठ्यांचे ऑनलाइन लिलाव झाले. लिलावांना कमी प्रतिसाद मिळाल्याने सुमारे ४० कोटींच्या महसुलावर पाणी सोडावे लागले. 
 
ऑनलाइनच्या किचकट प्रक्रियेमुळे लिलावांना कमी प्रतिसाद मिळतो. लिलावांना कमी प्रतिसाद मिळत असल्याने नदीपात्रांमधून चोरट्या मार्गाने वाळूउपसा केला जातो. त्यामुळे कोट्यवधींचा महसूल बुडतो. पावसामुळे लिलाव प्रक्रिया पूर्णपणे थांबली. सप्टेंबर महिन्यात लिलाव होणार होते. मात्र, नदीपात्रांमधील पाणी कमी झाल्याने हे लिलाव आणखी एक महिना पुढे ढकलले जाण्याची चिन्हे अाहेत. एकीकडे वाळू मिळत नसल्याने शहर परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे थांबली अाहेत. कोट्यवधींची गुंतवणूक करून बांधकाम व्यावसायिकांनी बांधकामांसाठी जागा घेतल्या आहेत. मात्र, केवळ वाळू नसल्यामुळे कामे थांबल्याने त्यांची मोठी अडचण झाली आहे. दुसरीकडे साठवून ठेवलेल्या वाळूची सध्या चार पट दराने विक्री होत आहे. सध्या ब्रास वाळू तीन ते चार हजार रुपये दराने विकली जात आहे. 
 
आठ तालुक्यांतील लिलावांचे प्रस्ताव 
२०१७-१८ या नव्या वर्षासाठी लिलावाची प्रक्रिया प्रशासनाने सुरु केली असून, आठ तालुक्यांतील वाळू लिलावांचे प्रस्ताव वरिष्ठ भूवैज्ञानिक विभागाकडे पाठवण्यात आले आहे. त्यातील काही साठ्यांना परवानगी मिळाली असली, तरी उर्वरित साठ्यांना मात्र परवानगी मिळालेली नाही. 
बातम्या आणखी आहेत...