आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतप्त ग्रामस्थांनी पेटवून दिले वाळूचोरी करणारे तीन ट्रॅक्टर; नेवासे तालुक्यातील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेवासे (जि. नगर)- तालुक्यातील शिरेगाव व मांजरी येथील मुळा नदीपात्रामध्ये वाळूचोरी करणारे तीन ट्रॅक्टर ग्रामस्थांनी पेटवून दिले. या घटनेमुळे वाळूतस्करांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.

नेवासे तालुक्यामध्ये मुळा, प्रवरा आणि गोदावरी या तीन नद्यांची मोठी पात्रे आहेत. त्यात प्रवरा आणि मुळा या दोन नदीपात्रातील वाळू स्वच्छ असल्याने या वाळूला नेहमीच चांगला भाव मिळतो. त्यामुळे नेवासे तालुक्यात नेहमीच वाळूतस्करी चालू असते. याला पायबंद घालण्याचा प्रशासनाने प्रयत्न केला तरी गावोगावचे स्थानिक युवक व सर्वच गाव पुढारी या व्यवसायामध्ये असल्याने वाळू चोरीला आळा बसू शकत नाही. सध्याचा कडक उन्हाळा व पाण्याची तीव्र टंचाई पाहता अनेक गावातील नागरिक जागृत झाले आहेत. नेवासे तालुक्यात मुळा थडी पाणी आरक्षण समिती, प्रवरा नदी पाणी बचाव समिती आदी समित्या गत पाच वर्षांत स्थापन झाल्या आहेत. सध्याच्या परिस्थितीत बोअरवेल व विहिरींची पाणाी पातळी खालावली आहे. त्यामुळे अनेक गावांत वाळू तस्करीला विरोध होत आहे.

पाणेगाव येथे ग्रामसभा घेऊन वाळूबंदीचा ठराव केला होता. प्रशासनाला तसेच वाळू तस्करांनाही त्यांनी सांगितले होते. मात्र, तरीही प्रशासन, पोलिस यांच्याकडे अर्ज करूनही या गोष्टी कानाडोळा होत होता. परिणामी वाळूतस्करांची मनोबल पण वाढले होते. रात्री पुन्हा एकदा नदी पत्रात ट्रॅक्टर उतरलेले समजल्यावर शिरेगाव व मांजरी दोन्ही गावाचे ग्रामस्थ नदी पात्रात जमा झाले. पाच ट्रॅक्टर व सुमारे ५० मजूर आणि तस्कर होते. ट्रॅक्टर हे गावातल्या अमरधामातील प्रवेशद्वार तोडून नदीत उतरले. त्यामुळे ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या. बाचाबाची सुरू झाल्यावर ट्रॅक्टर चालकांनी व मजुरांनी लाठ्या-काठ्या काढल्या आणि ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. दोन ट्रॅक्टर पळून जाण्यात यशस्वी झाले. पण तीन ट्रॅक्टर ग्रामस्थांनी पेटवून दिले. सकाळपर्यंत ट्रॅक्टर पेटलेले होते. सकाळी दहा वाजेपर्यंत या प्रकरणाची प्रशासनाने दखल घेतली नव्हती.