आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुख्यात वाळूतस्कर हिंमत जाधव इमामपूर घाटातील गोळीबारात ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - राहुरी तालुक्यातील पिंप्री गवळी येथील कुख्यात वाळूतस्कर हिंमत अभिमन्यू जाधव (वय २८) हा गावठी कट्ट्यातून केलेल्या गोळीबारात ठार झाला. दुचाकीवरुन पाठलाग करुन अज्ञात हल्लेखोरांनी त्याचा इमामपूर घाटात "गेम' केला. ही घटना मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास नगर-औरंगाबाद रस्त्यावरील इमामपूर घाटाजवळ एका हॉटेलसमोर घडली. हिंमतसमवेत असलेला आणखी एक युवकही गोळीबारात जखमी झाला. पूर्ववैमनस्यातून हा खून झाला असावा, अशी शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली.

वाळूतस्कर हिंमत जाधव त्याच्या साथीदारांनी २४ मे २०१२ रोजी कारवाई करण्यासाठी आलेल्या दोन पोलिसांवर प्राणघातक हल्ला केला होता. ही घटना टाकळीमियाँ-मुसळवाडी रेल्वे चौकीजवळ घडली होती. दोन पोलिस कर्मचारी यात गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी हिंमतसह त्याच्या साथीदारांवर गुन्हा नोंदवण्यात आला. या खटल्याचे कामकाज नगरच्या न्यायालयात सुरु आहे. या खटल्याच्या तारखेसाठी मंगळवारी सकाळी हिंमत नगरला आला. येथील काम आटोपून तो एका मित्रासह दुचाकीवर बसून माघारी जात होता.

इमामपूर घाट सुरू होण्यापूर्वी डाव्या बाजूला एका हॉटेलसमोर पाठीमागून बजाज पल्सरवर आलेल्या हल्लेखोरांनी हिंमतवर गोळीबार केला. त्यामुळे हिंमत त्याचा सहकारी तोल जाऊन रस्त्याच्या कडेला पडले. हल्लेखोरांनी त्याच्या जवळ येत पुन्हा दोन गोळ्या झाडल्या. मोठा रक्तस्त्राव होऊन हिंमत गतप्राण झाला. हिंमत ठार झाल्याची खात्री पटताच हल्लेखोर वेगाने पसार झाले. दरम्यान, गोळीबारात कुख्यात वाळूतस्कर ठार झाल्याचे समजताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली.

माहिती मिळताच नगर ग्रामीण उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे, सोनईचे सहायक निरीक्षक किरण शिंदे, एमआयडीसीचे सहायक निरीक्षक राहुलकुमार पवार घटनास्थळी आले. त्यांच्या पाठोपाठ पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, अतिरिक्त अधीक्षक घनश्याम पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही आले. हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी तत्काळ तपास पथके रवाना केली. पूर्ववैमनस्यातून हा खून झाला असल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.नेवासे, शेवगाव राहुरी तालुक्यात वाळू तस्करीमुळे गुन्ह्यांचा आलेख सातत्याने उंचावत आहे. सोमवारी घटना हा त्याचाच परिपाक आहे.

वाळूतस्करीमुळे खुनी हल्ले नेहमीचेच
मानोरी गावाजवळ मुळा नदीपात्रात वाळूचा मोठा साठा आहे. तेथून वाळूची अवैध वाहतूक होते. त्यातूनच स्थानिक गुंडांमध्ये अनेकदा मारामाऱ्या धुमश्चक्री झाल्या आहेत. कारवाईसाठी गेलेल्या महसूल पोलिस पथकांवरही हल्ले झाले आहेत. वाळूतस्करीमुळे गावात नेहमीच तणावाचे वातावरण असते. यापूर्वीही रक्तरंजित घटना घडल्या आहेत. वाळूतस्करांकडील गावठी कट्टे ही बाबही जिल्ह्यासाठी नवीन राहिलेली नाही.

या पूर्वीही झाला होता हल्ला
वाळू व्यवसायातील वादातून राहुरी तालुक्यात अनेकदा टोळीयुद्ध झाले आहे. २७ एप्रिल २०१५ रोजी मानोरी गावात हिंमत ऊर्फ चंद्रकांत अभिमन्यू जाधव याच्यावर दोन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. श्रीनाथ चिलिंग प्लांटजवळील वळण रस्त्यावर घडलेल्या या घटनेतही गावठी कट्ट्याचाच वापर झाला होता. त्याच्यावर नगरमध्ये एका उपचार करण्यात आले होते. याप्रकरणी राजू शेटे, नाथा डमाळे यांच्या टोळीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता.
बातम्या आणखी आहेत...