आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावेडी परिसरात वाढतेय चंदनाच्या चोरीचे प्रमाण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- सावेडी तसेच सिव्हिल हडको परिसरातील महापालिकेच्या मोकळ्या जागेतील चंदनाची झाडे चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत. याला महापालिका प्रशासन जबाबदार आहे. चंदनचोरांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी हरियाली संस्थेने केली आहे. दोन दिवसांपूर्वी या परिसरातून चंदनाची तीन झाडे चोरट्यांनी कापून नेल्याचे संघटनेने म्हटले आहे.

हरियालीचे अध्यक्ष व मनपाच्या वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य सुरेश खामकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, दोन दिवसांपूर्वी सिव्हिल हडको परिसरातून तीन चंदनाच्या झाडांचा गाभा चोरट्यांनी कापून नेला आहे. खामकर यांनी घटनास्थळी पाहणी करून खात्री पटल्यानंतर मनपाचे वृक्षाधिकारी यू. जी. म्हसे यांना पंचनामा करण्याची मागणी केली. त्यानुसार म्हसे यांनी पाहणी करून फौजदारी कारवाई प्रस्तावित केली आहे. नगर शहरासह जिल्हाभरात चंदनचोरांचे मोठे रॅकेट आहे. अत्यंत गोपनीय पद्धतीने चंदनचोरटे खासगी जागेतील चंदनाची झाडे कापून नेतात. त्यामुळे ज्या नागरिकांच्या जागेत चंदनाचे वृक्ष असतील त्यांनी सजग रहावे, असेही आवाहन खामकर यांनी केले आहे. चंदनचोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी लवकरच पोलिस प्रमुखांना निवेदन देऊन त्याचा पाठपुरावा करणार असल्याचे खामकर यांनी सांगितले आहे.