आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाऊबीजेनंतर आता रक्षाबंधनही सुने सुने, आमचा हरवलेला भाऊ आणून द्या, एवढेच मागणे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - भावा-बहिणीच्या पवित्र नात्याची आठवण जपणारा रक्षाबंधनाचा सण गुरुवारी सर्वत्र मोठ्या उत्साहात अन् आनंदात साजरा होतोय, पण सोनेवाडीतील (ता. कोपरगाव) दोन बहिणी मात्र गेल्या एक वर्षापासून त्यांच्या एकुलत्या एका भावाची आतुरतेने वाट पहात आहेत. गेल्या भाऊबीजेनंतर त्यांचा रक्षाबंधन सण भावाशिवाय सुना सुना साजरा होत आहे. त्यांचा भाऊ पोलिस दफ्तरी अजूनही ‘मिसिंग’च आहे. आता या दोन्ही बहिणींनीही व्यवस्थेपुढे हार पत्करली आहे. किमान आपला भाऊ जेथे असेल तेथे सुखरूप रहावा, एवढ्या अपेक्षेने पाणावलेल्या डाेळ्यांनी त्या भावाची वाट पहात आहेत.
साेनेवाडीतून ऑक्टोबर २०१५ मध्ये बेपत्ता झालेल्या संदीप राजेंद्र घोलप (वय ३५) याच्या कुटुंबाची ही व्यथा आहे. प्लंबिंगचे काम करणारा संदीप १० ऑक्टोबर २०१५ पासून बेपत्ता आहे. नाशिकला गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याच्या बंगल्याचे काम मिळाले असल्याचे सांगून काही व्यक्तींबरोबर तो गेला. तेव्हापासून त्याचा संपर्क तुटला. वडिलांनी कोपरगाव पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार नाेंदवली, पण आतापर्यंत त्याचा काहीही ठावठिकाणा लागलेला नाही. त्याच्या दोन बहिणी वडील त्याच्या शोधात आहेत.

संदीपच्या घरात आई, वडील, दोन बहिणी असा परिवार आहे. त्याची व्यक्तीश: कोणाशीच दुश्मनी नव्हती. संदीपच्या जाण्यापूर्वी घोलप कुटुंबीयांचे शेतजमिनीवरून वाद झाले होते. समोरच्या लाेकांनी सर्व कुटुंबाचाच घातपात करू, अशी धमकी दिली होती. त्यामुळे सुरुवातीला घोलप कुटुंबीयांचा संशय त्या व्यक्तींवर होता. पण त्यादृष्टीने केलेल्या तपासातही काहीच निष्पन्न झाले नाही. जुलै २०१६ मध्ये संदीपच्या एका बहिणीच्या फोनवर अज्ञात व्यक्तीचा फोन आला. आम्ही तुझ्या भावाला संपवले असून तुमच्या संपूर्ण कुटुंबालाही खल्लास करू, असे त्याने धमकावले. अशा वारंवार धमक्या आल्यामुळे बहिणीने पोलिस ठाण्यात धाव घेतली.
अज्ञात व्यक्तीविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली, पण इतर ‘मिसिंग’ अदखलपात्र गुन्ह्यांचा तपास जसा होतो, तसेच या प्रकरणातही झाले. काही अधिकाऱ्यांनी व्यक्तीश: या प्रकरणात लक्ष घातले. पण तरीही काही धागेदोरे गवसले नाहीत. योगिता शीतल या संदीपच्या बहिणी पोलिस ठाण्यांचे उंबरठे झिजवून आता थकल्या आहेत. गेल्या महिन्यात अखेरचा उपाय म्हणून त्यांनी थेट पोलिस अधीक्षकांची भेट घालून त्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. पोलिस अधीक्षकांनीही स्थानिक पोलिसांना सूचना करून तपासाचे आश्वासन दिले, पण तरीही उपयोग झाला नाही.

रक्षाबंधन सणाच्या दिवशी भावाला ओवाळल्यानंतर तो बहिणीला तिच्या रक्षणाचे वचन देतो. बहीणही भावाच्या आयुष्याची दोरी बळकट रहावी, अशी प्रार्थना देवाकडे करत असते. इथे मात्र योगिता अन शीतल या दोन्ही बहिणींच्या नशिबी हतबल होत हरवलेल्या संदीपची वाट पाहणे, एवढेच आता उरले आहे.
धागेदोरे मिळाले असते
संदीपच्या शोधासाठी पोलिसांनी काहीच प्रयत्न केले नाही, असेही नाही. मध्यंतरी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्तीश: या प्रकरणात लक्ष घातले. काही प्रमाणात धागेदोरे मिळाले असे वाटत असतानाच त्यांच्याकडे इतर गंभीर गुन्ह्यांचा तपास आला. त्यामुळे त्यांनी कोपरगाव पोलिसांना सूचना मार्गदर्शन केले. त्याच वेळी जर पोलिसांनी लक्ष केंद्रित करून तपास वेगाने केला असता, तर किमान संदीपबद्दल महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकली असती. तसे झाल्यामुळे बेपत्ता संदीपचा अजूनही शोध लागलेला नाही.

फक्त तपास सुरू
योगिता, शीतल या बहिणी त्यांचे वडील गेल्या दीड वर्षापासून पोलिसांकडे भावाची चौकशी करत आहेत. कोपरगावचे पोलिस निरीक्षक शहाजी नरसोडे यांनी सुरुवातीपासून या प्रकरणात व्यक्तीश: लक्ष घातले. वेगवेगळ्या बाजूंनी संदीपचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनाही यश अाले नाही. ज्या हवालदाराकडे तपास आहे, त्यानेही बरेच कष्ट घेतले. घोलप कुटुंबीयांकडून वारंवार होणाऱ्या विचारणेला पाेलिसही आता वैतागले आहेत. कुटुंब विचारणा करण्यासाठी आले की, पोलिसांचे चेहरे त्रासिक होत असल्याचे दिसून येते.
बातम्या आणखी आहेत...