आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निविदा घोटाळा: मुख्याधिकार्‍यांसह नगरसेवकाविरुद्ध तक्रार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर- पदाचा गैरवापर करून स्वत:च्या मुलाला निधीचा लाभ करून देणार्‍या संगमनेर नगरपालिकेच्या नगरसेवकासह त्याचा मुलगा आणि तत्कालीन मुख्याधिकार्‍यांविरोधात कारवाईसाठी माजी नगरसेवकाने पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष व माजी नगरसेवक शरीफ शेख यांनी बांधकाम समितीचे तत्कालीन सभापती इसहाकखान पठाण, त्यांचा मुलगा यासिरखान आणि तत्कालीन (सध्या पेण येथे) मुख्याधिकारी असलेल्या विजयकुमार द्वासे यांच्याविरोधात ही तक्रार केली. नगरसेवक आणि मुख्याधिकार्‍यांविरोधात थेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

इसहाकखान सरदारखान पठाण हे सत्ताधारी काँग्रेसचे नगरसेवक असून गेल्या वर्षी ते बांधकाम समितीचे सभापती होते. त्यांची स्थायी समितीवरही निवड झाली. पठाण यांनी याच अधिकाराचा गैरवापर करीत पालिकेने 2012-13 या आर्थिक वर्षासाठी काढलेल्या वार्षिक पुरवठय़ासंदर्भातील ठेके आपल्या मुलाला यासिरखान याला मिळवून दिले. तसेच या ठेक्याचे पैसेही त्याला मिळवून दिले, असा शेख यांचा आरोप आहे.

तत्कालीन सभापती पठाण व मुख्याधिकारी द्वासे यांच्या सहीने तीन कामांच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. पठाण यांनी आपल्या नातेवाईकांच्या नावाने प्रत्येक कामासाठी तीन निविदा पाठवल्या. टायर- ट्यूब पुरवण्यासाठीच्या निविदेत त्रुटी असतानाही मुख्याधिकार्‍यांनी निविदा अवैध असल्याबाबत अहवाल दिला नाही. त्यामुळे त्याचा लाभ पठाण यांचा मुलगा यासिरखानला मिळाला, असे शेख यांचे म्हणणे आहे. जेसीबी दुरुस्तीसंदर्भातील निविदेतही असाच प्रकार झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

काय आहे निविदेतील गौडबंगाल
निविदा क्रमांक 37 ही टायर व ट्यूब पुरवण्यासाठीची असून त्यासाठी आलेल्या तीन निविदा पुढीलप्रमाणे- 1) अलका टायर्स, संगमनेर 2) शक्ती टायर्स, संगमनेर आणि 3) अलका टायर्स अँण्ड ट्रेडर्स, संगमनेर (यावर निविदा भरणार्‍या फर्मच्या मालकाची सही व शिक्काच नाही. नेमक्या याच निविदेला मंजुरी देऊन यासिरखान पठाण याला ठेका देण्यात आला. यासिरखान हा तत्कालीन सभापती इसहाकखान पठाण यांचा मुलगा आहे.

निविदा क्रमांक 38 ही बॅटर्‍या पुरवण्यासाठी होती. यासाठी अँक्सा बॅटरी, सुपर बॅटरी व अलका टायर्स अँण्ड ट्रेडर्स यांच्या निविदा होत्या. यातील अँक्सा बॅटरी ही फर्म तन्वीरखान याच्या नावावर आहे, तर अलका टायर्स अँण्ड ट्रेडर्स ही फर्म यासिरखान याच्या नावावर आहे. दोघेही इसहाकखान पठाण यांची मुले आहेत. अँक्सा व सुपर बॅटरी ही दोन्ही दुकाने बंद आहेत. त्यामुळे हा ठेकाही यासिर यालाच मिळाला.

मे 2012 मधील जेसीबी दुरुस्तीसंदर्भातील निविदेसाठी अलका टायर्स अँण्ड ट्रेडर्स, व्ही. आय. पी. स्पेअर स्पार्ट आणि अलका अँटोमोबाईल्स व अँटो कन्सल्टंट यांच्या निविदा होत्या. यातील व्ही. आय. पी. स्पेअर स्पार्ट ही फर्म मोमीन जुनेद हरून यांच्या मालकीची असून ते इसहाकखान पठाण यांचे जावई आहेत, तर अलका ऑटोमोबाईल्स ही फर्म इसहाकखान पठाण यांचे बंधू इब्राहिमखान यांच्या मालकीची आहे. येथेही अलका टायर्सला म्हणजेच यासिरखान याला ठेका देण्यात आला.
या प्रकाराची सध्या संगमनेरमध्ये जोरदार चर्चा असून पुढे काय कारवाई होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

अद्याप गुन्हा दाखल नाही
माजी नगरसेवक शरीफ शेख यांनी आमच्याकडे तक्रारअर्ज दिला आहे. यासंदर्भात आम्ही चौकशी करीत आहोत. जिल्हाधिकार्‍यांकडेही शेख यांनी तक्रार केली असल्याने त्यांच्याकडेही यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे यासंदर्भात अद्याप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.’’
-प्रकाश सावंत, पोलिस निरीक्षक, संगमनेर शहर.