नगर - महापालिकेतील शिवसेना-भाजपची सत्ता संपुष्टात आणून महापौर, उपमहापौरपदी आरूढ होण्यात राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीला यश मिळाले. 7 अपक्ष व 4 मनसे नगरसेवकांच्या पाठबळावर सोमवारी राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांची महापौर, तर काँग्रेसच्या सुवर्णा कोतकर यांची उपमहापौरपदी निवड झाली. सुवर्णा कोतकर या महापौर जगताप यांच्या पत्नीच्या सख्ख्या भगिनी, तर माजी महापौर संदीप कोतकर यांच्या पत्नी आहेत.
सर्वाधिक 18 जागा जिंकणार्या राष्ट्रवादीने सत्ता स्थापनेसाठी सात अपक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चार नगरसेवकांचा आधार घेत आवश्यक 35चे संख्याबळ गाठले. या निवडीत काही चमत्कार होईल, अशी आशा युतीला वाटत होती. त्यासाठी शिवसेनेचे अनिल शिंदे व भाजपचे बाबासाहेब वाकळे यांनी महापौरपदासाठी अर्ज भरला होता.