आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sanjay Dutt Pardon Issue: Sopan Deshmukh Talk On Markandey Katju

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मार्कंडेय काटजू शिपाई होण्याच्या पात्रतेचे नाहीत - प्रा. सोपान देशमुख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर - संजय दत्तची शिक्षा माफ करा, असे म्हणणारे मार्कंडेय काटजू सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झालेच कसे, ते साधे शिपाईही होण्याच्या लायकीचे नाहीत, अशी टीका करत शिवाजी महाराजांच्या काळात अशा पद्धतीने शिक्षा माफ करण्याची मागणी करण्याचे धाडसदेखील कोणी दाखवले नसते, असे प्रतिपादन शिवचरित्राचे अभ्यासक प्रा. सोपान देशमुख यांनी केले.

संगमनेरमधील नवघरगल्ली हिंदू मित्रमंडळ व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने शुक्रवारी मालपाणी लॉन्सवर ‘शिवशाही व आजची सामाजिक परिस्थिती’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गीता परिवाराचे संस्थापक डॉ. संजय मालपाणी होते. संघचालक अशोक सराफ, नवघर मंडळाचे अध्यक्ष व उद्योजक राजेश चौधरी, विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष प्रा. अरुण लेले व्यासपीठावर उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी माणसाला महत्त्वाकांक्षा मिळवून दिली आहे. त्यांच्या नावाचा जयजयकार करून चालणार नाही, तर त्यांच्या विचारांचे अनुकरण व्हायला हवे. आपण त्यांचे विचारच विसरल्याने आजची अराजकता निर्माण झाली. चातुर्वण्य व्यवस्थेनेच समाजाचे मोठे नुकसान केल्याचे सांगत 17 व्या शतकात जन्मलेल्या महाराजांनी इतिहास रचला, तर 19 व्या शतकातील शिवाजी म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. मात्र, त्यांनाही आपण नीटपणे समजून घेऊ शकलो नाही. इतिहासापासून कोणतेही धडे आपण घेतले नाही. त्यामुळे समाजाचे मोठे नुकसान झाले, असे देशमुख यांनी सांगितले. आपल्यातील दोष आपण समजून घेत नसल्याने आपल्या वाट्याला कायमच गुलामगिरी आली. शिवजन्मापूर्वीची परिस्थिती आज देशात पुन्हा जन्माला आल्याचे सांगत पुन्हा शिवाजीने जन्म घ्यायला हवा अशी चर्चा होते. आजच्या जिजाऊला टीव्हीने आपल्या पाशात अडकवले आहे. 17 व्या वर्षी छत्रपतींनी मुस्लीम साम्राज्याशी लढा देऊन स्वराज्याची निर्मिती केली. आमचे आजचे 17 वर्षे बीअरबारमध्ये दिसते. मावळ्यांच्या निष्ठेची भक्कम तटबंदी छत्रपतींभोवती होती. त्यांनी मावळ्यांना घेऊन लढाया केल्या मात्र आज माकडांना बरोबर घेऊन निवडणुका लढवल्या जात आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. महाराजांच्या काळातील निष्ठा आज शिल्लक राहिली नाही. देशात अतिरेकी येतात आणि आमच्यावर हल्ले करतात, माणसे मारली जातात, तरीही आमचे नेते शांतच असतात. आजचे राज्य हे सबब सांगणार्‍यांचे बनल्याची टीका देशमुख यांनी केली. प्रास्ताविक राजेश चौधरी यांनी केले.