आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जत डायरी: विरोधक क्षीण झाल्याने शेतकऱ्यांना कोणी वालीच नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अस्मानी संकटाबरोबरच सुलतानी संकट काय असते. त्याचा अनुभव सध्या कर्जत तालुक्यात येत आहे. गेल्या पाच वर्षांपासून तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे दुष्काळाचा सामना येथील शेतकरी, शेतमजूर करत आहेत. शासनाकडून मदतीची याचना करूनही शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत येथील शेतकऱ्यांना मिळाली नाही. दुष्काळी परिस्थिती असूनही मजुरांसाठी रोजगार हमीची कामे सुरू होऊ शकली नाहीत. या मतदारसंघाचे आमदार जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही त्यांना येथील दुष्काळाचा विसर पडला आहे. पालकमंत्री तालुक्यात फक्त मोठमोठी आश्वासने देताना दिसत आहेत. येथील राजकीय विरोधकही विधानसभेच्या निवडणुकीपासून काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेना सोडून भाजपत आले आहेत. त्यामुळे कर्जत तालुक्यातील विरोधी पक्षांची ताकद खूपच कमी झाली आहे. जे काही विरोधक आहेत, ते एकतर विरोध करून थकले आहेत. किंवा स्वत:साठी तडजोड करून सहमतीचे राजकारण करताना दिसत आहेत. त्यामुळे या भागातील शेतकरी मजुरांना कोणीच वाली राहिलेला नाही.
सलग पाच वर्षांच्या दुष्काळी परिस्थितीमुळे कर्जत तालुक्यातील शेती पूर्णपणे नष्ट होईल का काय अशी परिस्थिती निर्माण झाली. येथील मोठ्या कष्टाने पिकवलेल्या फळबागा यावर्षी पूर्णपणे नामशेष होण्याची शक्यता आहे. पाऊस नसल्याने पाणी उपलब्ध नाही. त्यातच पावसाअभावी खरिपाची रब्बीची पिके वाया गेली. आता जिवापाड जपलेल्या फळबागाही जळून जाऊ लागल्या आहेत. आता पाणी शिल्लक नाही विकतचे पाणी घेऊन फळबागा जगवण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये राहिलेली नाही. गेल्या दोन वर्षांत दुष्काळ असल्याने याच फळबागा जागवण्यासाठी शासनाकडून येथील शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत मिळाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून फळबागा जागवल्या होत्या. यावर्षी मात्र अनुदान नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक आधार राहिला नाही.

सलग दोन वर्षी जनावरांच्या छावण्याही सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे जनावरांना चारा पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. सध्या जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला. भाजप-शिवसेना महायुतीच्या शासनाकडून मात्र जनावरांसाठी चारा डेपो किंवा छावण्याही सुुरू करण्यात आल्या नाहीत. आता जनावरे कशी जगवायची हा प्रश्न निर्माण झाला. मागील दोन महिन्यांपूर्वी मंत्रालयात नगर जिल्ह्यात जनावरांच्या छावण्या सुरू होणार अशी चर्चा झाली होती. तसा आदेशही काढण्यात आला होता. मात्र, त्यात नेमकी कोठे माशी शिंकली हे समजू शकले नाही. एकीकडे शासन कोणत्याही प्रकारची मदत दुष्काळग्रस्तांना करत नाही. कर्जत तालुक्यातील दुष्काळ ही एक शोभेची वस्तू झाली. कारण येथील दुष्काळ पाहण्यासाठी बाहेरून अनेकजण येतात दुष्काळ पाहून जातात. मात्र, येथील खंबीर असणारा शेतकरी अद्यापही आत्महत्या करत नसल्याने येथील दुष्काळाची दाहकता अजूनही शासनासह कोणाच्याच लक्षात येत नाही.
कर्जतचे आमदार जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे मात्र प्रत्येक दौऱ्यात अाश्वासनांची खैरात करताना दिसतात. यापूर्वीच काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेनेतून भाजपत दाखल झालेले नेते कार्यकर्तेही सध्या भाजपत रमलेले दिसत नाहीत. बाहेरच्या पक्षातून भाजपत आले आहेत. त्यापैकी अनेकांवर आता पश्चाताप करण्याची वेळ आली. कारण सध्या सत्ताधारी पक्षात असल्याने या नेत्यांना उघड्या डोळ्याने तालुक्यातील दुष्काळ पहावा लागत आहे. ज्या भाजपसाठी मते मागितली, तो पक्ष सत्तेत असल्याने येथील लोकांना शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. ही मदत का मिळत नाही याचे काय उत्तर द्यायचे हा प्रश्न निर्माण झाला. या प्रश्नाचे उत्तर मात्र पालकमंत्र्यासह कोणाकडेही नाही. भाजपत आल्याने पूर्वी सत्ताधारी पक्षात असताना आता काय तो फरक सर्वांनाच पावलोपावली जाणवत आहे. मात्र, आता याच कार्यकर्त्यांच्या हातात काहीही शिल्लक राहिले नाही. त्यामुळे सध्यातरी भाजपत आलेल्या नेत्यांवर कार्यकर्त्यांवर तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाण्याची वेळ आली. कर्जत तालुक्यात काँग्रेस, राष्ट्रवादीमधील विरोधकही दुष्काळावरून आंदोलनाची संधी आलेली असतानाही शासनाची पालकमंत्र्यांची कोंडी करणे सोडून आपणच सत्ताधारी असल्याच्या थाटात वावरत आहेत.
काँग्रेस आघाडीच्या काळात मिळाली मदत
कर्जततालुक्यात गेल्या पाच वर्षांपासून दुष्काळी स्थिती आहे. मात्र, मागील दोन-तीन वर्षांत आघाडी शासनाकडून चारा डेपो, जनावरांच्या छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर मजुरांसाठी रोजगार हमीची कामे मोठ्या प्रमाणावर करण्यात आली होती. खरीप रब्बी पिकांसाठी पीकविमा, तसेच फळबागांसाठी खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत केली होती. त्यामुळे मागची ही दुष्काळी वर्षे शेतकरी, मजूर फळबागायतदारांना सुसह्य गेली असे म्हणण्याची वेळ तालुक्यातील शेतकऱ्यांवर आली आहे.