आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjeev Mehendale's Scenic Concerts In Mirikar Wada

मिरीकर वाड्यात रंगली संजीव मेहेंदळे यांची बहारदार मैफल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- कोर्टगल्लीतील सरदार मिरीकरांच्या दिवाणखान्यात शुक्रवारी सायंकाळी स्मृती संगीत सभेची जमून आलेली सुरेल मैफल रसिकांना स्वरानंदाची सुखद अनुभूती देऊन गेली. मेहेंदळे यांच्या गायनाला संजय गोगटे यांच्या नजाकतपूर्ण हार्मोनियम स्वरांची आणि विद्यानंद देशपांडे यांच्या शैलीदार तबला साथीची उत्तम जोड मिळाल्याने मैफल सुरुवातीपासून रंगत गेली. मेहेंदळे यांनी आपल्या गायनाची सुरुवात मारवा रागातील ख्यालाने केली. विलंबित एकतालातील मोठय़ा ख्यालाची बंदिश होती ‘गावे गुणी’ ही. त्रितालातील छोटा ख्याल ‘बहुत दिन बिते’ त्यांनी मोठय़ा तयारीने सादर केला. नंतर मारवा रागातील ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकातील ‘मुरलीधर शाम’ हे गीत त्यांनी सादर केले. बागेर्शी रागातील तराण्यानंतर मध्यंतर झाला.

मैफलीचा उत्तरार्ध मेहेंदळे यांच्या नाट्यगीतांनी रंगत गेला. ‘रतिहून सुंदर मदनमंजिरी’ या नाट्यगीतानंतर त्यांनी ‘माझे माहेर पंढरी’ हा अभंग सादर केला. संत पुरंदरदासांचे कानडी भजन त्यांनी म्हटले. नंतर ‘सुरत पिया की’ हे नाट्यगीत सादर केले. त्यांनी गायलेल्या तराण्याला र्शोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. मैफलीची सांगता ‘अवघे गरजे पंढरपूर’ या भैरवीतील अभंगाने झाली.डॉ. गोपाळराव मिरीकर यांनी प्रास्ताविक केले. अँड. गौरव मिरीकर यांनी गायक, साथीदार यांचा परिचय करून दिला. मिरीकर परिवारातर्फे गायक व साथसंगत करणारे कलावंत, तसेच कार्यक्रमास उपस्थित दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर प्रधान यांचा सत्कार करण्यात आला गांधर्व महाविद्यालयाच्या संगीत विशारद परीक्षेत प्रथम आल्याबद्दल साधना बोर्‍हाडे, तसेच संगीत विशारदमध्ये प्रथम आलेले संतोष दिवटे व राधिका पाठक हिचा संगीत अलंकारमध्ये प्रथम आल्याबद्दल सत्कार करण्यात आला. अँड. रावसाहेब मिरीकर यांनी आभार मानले.

ऐतिहासिक दिवाणखाना
सरदार मिरीकर यांच्या कोर्टगल्लीतील वाड्यात असलेल्या दिवाणखान्यात अनेक मान्यवरांच्या मैफली झाल्या आहेत. बालगंधर्वही येथे गाऊन गेले आहेत. कधीकाळी हा वाडा म्हणजे नगर शहराचे सांस्कृतिक केंद्र होते..