नगर- जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या पुढाकाराने नगरमध्ये अनेक राज्यस्तरीय स्पर्धा होत असतात. आगामी काळात तज्ज्ञ मार्गदर्शकांना बोलावून राज्यातील बुद्धिबळपटूंना डावपेच शिकवण्यासाठी नगरमध्ये प्रशिक्षण आयोजित केले जाईल, अशी माहिती जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष व उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी दिली.
जिल्हा बुद्धिबळ संघटना व डी. एल. बी. ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने शांतीकुमार फिरोदिया यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे उदघाटन सोमवारी सकाळी झाले. भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार, किरण मणियार, आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडू अनुप देशमुख, सूरज सोनार, बुद्धिबळ असोसिएशनचे सचिव यशवंत बापट प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. नगरमधील खेळाडू बुिद्धबळात पुढे येण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले जातील. भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या माध्यमातून बुद्विबळाच्या अनेक स्पर्धा आयोजित केल्या जातील, असेही ते म्हणाले. नागपूरचे आंतरराष्ट्रीय खेळाडू अनुप देशमुख म्हणाले, बुद्धिबळात नगरचे खेळाडू अतिशय गुणवंत असून त्यांना प्रशिक्षणाच्या दृष्टिकोनातून नगरमध्ये येऊन प्रशिक्षण दिले जाईल. नेटके नियोजन केल्याबद्दल बुद्धिबळ संघटनेचे त्यांनी कौतुक केले.
फिरोदिया यांनी प्रास्ताविक केले. संघटनेच्या वतीने वर्षभरात घेण्यात येणाऱ्या स्पर्धांची माहिती त्यांनी दिली. संघटनेचे सचिव यशवंत बापट यांनी स्वागत केले. किरण मणियार व सूरज सोनार यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेसाठी पंच म्हणून प्रवीण ठाकरे (जळगाव) व प्रेम पंडित (मुंबई) काम पहात आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे विश्वस्त पारूनाथ ढोकळे यांनी केले. आभार श्याम कांबळे यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्विततेसाठी खजिनदार सुबोध ठोंबरे, प्रशिक्षक प्रकाश गुजराथी, समीर खडके आदी प्रयत्नशील आहेत.
दोनशेहून अधिक खेळाडूंचा स्पर्धेत सहभाग
या आंतरराष्ट्रीय मानांकन स्पर्धेत राज्यभरातील सुमारे 200 हून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. स्पर्धा 3 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत खिस्त गल्लीतील सप्तक सदनमध्ये होईल. नगरमधील खेळाडू संकर्ष शेळके (ता. पारनेर) हा 17वर्षे वयोगटातून रायगड येथे राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम आला. या कामगिरीबद्दल त्याचा मान्यवरांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.