नगर - जिल्ह्यातील महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी, तसेच शासनाच्या परिपत्रकानुसार बदललेल्या परीक्षा पद्धतीबाबत प्राध्यापकांना मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षण उपसंचालकांच्या वतीने पेमराज सारडा महाविद्यालयात दोन दिवसांचा उद्बोधन वर्ग घेण्यात आला. सहायक शिक्षण उपसंचालक मिनाक्षी राऊत यांच्या हस्ते या वर्गाचे उदघाटन झाले. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांतील विज्ञान, कला वाणिज्य शाखेचे सुमारे एक हजारहून अधिक प्राध्यापक या वर्गास उपस्थित होते. राऊत यांचा सारडा महाविद्यालयाच्या वतीने उपप्राचार्य सुजाता काळे यांनी सत्कार केला. यावेळी हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा, महाविद्यालयाचे अध्यक्ष अॅड.अनंत फडणीस, उपप्राचार्य डॉ.राजेंद्र शिंदे, प्रा. माणिक विधाते, प्रा.भाऊसाहेब कचरे, प्रा. जऱ्हाड, प्रा. खाजेकर आदी प्राध्यापक संघटनेचे सदस्य उपस्थित होते. पुण्यासह विविध जिल्ह्यांतील तज्ज्ञ मार्गदर्शकांनी प्राध्यापकांना विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मार्गदर्शन केले.
राऊत म्हणाल्या, पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्याने उद्बबोधन वर्गाचे आयोजन करण्यात येत आहे. पारंपरिक शिक्षण पद्धती आता बदलत आहे. त्यामुळे काळानुरुप शिक्षकांनीही अपडेट राहणे आवश्यक आहे. सर्व प्राध्यापकांनी स्वत:मध्ये बदल करणे आवश्यक आहे.