आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाचे सर्व शिक्षा अभियान धुळीत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासून संगणक हातळता यावे, यासाठी शासनाने सर्व शिक्षा अभियानांतर्गत महापालिकेच्या शाळांना संगणक दिले होते. हे संगणक धूळखात पडले असून त्यामुळे मनपाचे सर्व शिक्षा अभियानही धुळीस मिळाले आहे.
शहरात मनपाच्या बारा शाळा आहेत. या शाळांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत सहा वर्षांपूर्वी संगणक देण्यात आले होते. प्रत्येक शाळेला विद्यार्थी संख्येनुसार दोन-तीन याप्रमाणे पंधरा संगणक देण्यात आले. संगणकाबरोबरच यूपीएस, त्यासाठी लागणारे फर्निचर, वायरिंग, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाक हे साहित्यही देण्यात आले. काही शाळा मात्र संगणकापासून वंचित राहिल्या. काहींना संगणक मिळाले, पण प्रशिक्षणच मिळाले नसल्याने संगणकांचे करायचे काय, असा प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे. एखाद्या शाळेत नावापुरता एखादा संगणक सुरू आहे. बहुतेक शाळांमध्ये संगणकांची दुरवस्था झाली आहे. अक्षरश: ते धुळखात पडले आहेत. शिक्षण मंडळानेही पाठ फिरवल्याने त्यांची अवस्था ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली आहे.
सर्जेपु-यातील अहल्याबाई होळकर प्राथमिक विद्यालयातील संगणक कपाटात बंद आहेत. बुरूडगाव रस्त्यावरील छत्रपती शाहू महाराज प्राथमिक विद्यालयात संगणक आहेत, पण वीजजोड नसल्याने त्यांचा काहीच उपयोग नाही. झेंडीगेटच्या डॉ. अल्लामा इकबाल उर्दू प्राथमिक विद्यालयात संगणक स्टोअररुममध्ये ठेवण्यात आले आहेत.
मनपा शाळांमधील संगणक धुळखात पडले असतानाही शिक्षण मंडळाने इ-लर्निंगचा आग्रह धरला आहे. 1 ली ते 8 वी पर्यंतचा सर्व अभ्यासक्रम इ-लर्निंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर ठेवण्यात येणार आहे. यश मॅनेजमेंट कंपनीला सॉफ्टवेअर बसवण्याचे काम देण्यात आले असून त्यासाठी तीन लाख खर्च करण्यात येणार आहे. या शाळांमधील एकही संगणक सुस्थितीत नसल्याने हा खर्च वायाच जाणार आहे.
शिक्षण मंडळ प्रशासनाधिकारी सुधाकर शिदोरे यांना थेट प्रश्न
१> किती शाळांना संगणक आहेत?
- सर्व शाळांचे मिळून पंधरा संगणक आहेत. तथापि, सर्व शाळांना संगणक देण्यात आलेले नाहीत.
२> संगणक चालू आहेत का?
- संगणकांच्या देखभालीची जबाबदारी शिक्षण मंडळाची आहे. येत्या महिनाभरात सर्व संगणक सुरू करण्यात येणार असून विद्यार्थ्यांसाठी इ-लर्निंग अभ्यासक्रमही सुरू करण्यात येणार आहे. येत्या चार दिवसात त्याचे उदघाटन होणार आहे.