आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरमधून लागतो ‘आयपीएल’वर कोट्यवधी रुपयांचा सट्टा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - पुणे संघाला एक रुपयाला 110 पैसे, तर चेन्नई संघाला एक रुपयाला 55 पैसे असा बुकीचा फोन एजंटला, तर एजंटचा फोन सब एजंटला जातो. अन्य काही फोनवरही तशी माहिती पुरवली जाते. माझे मुंबईवर 4, कुणाचे 10, तर कुणाचे पुण्यावर 3 असे फोन खणखणत असतात. आयपीएल सामन्यांवर लावण्यात आलेल्या सट्टाबाजाराची नगरमधील ही स्थिती आहे. आयपीएलच्या प्रत्येक सामन्यावर सट्टय़ाद्वारे नगरमध्ये कोट्यवधींच्या बोली लावल्या जात आहेत. नगरमध्ये यासाठी सुमारे चारशे बुकींचे जाळे कार्यरत असल्याची माहिती समजली.

सट्टा लावणार्‍यांत विद्यार्थ्यांपासून व्यापार्‍यांपर्यंत सर्व स्तरांतील लोकांचा सहभाग आहे. हा सर्व प्रकार फोनद्वारे चालतो. त्यांचे कोठेही कार्यालय नाही. मात्र, व्यवहार अतिशय चोख असतो, अशी माहिती एका बुकीने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. तो म्हणाला, सामना सुरू होण्याच्या काही तास अगोदर रेट बाहेर पडतात. ज्या संघाचा रेट जास्त, त्या संघाची जिंकण्याची शक्यता कमी असे समजले जाते. सट्टा बाजारात एक म्हणजे एक हजार रुपये असे मानले जाते. त्यानुसार संघावर बुकिंग केले जाते. सट्टा विजय किंवा पराजयावरच खेळला जात नाही, तर सामन्याचा टॉस कोण जिंकणार, यावरही लावला जातो. कोणता खेळाडू किती धावा काढणार, कोणता गोलंदाज किती विकेट काढणार, कोणत्या ओव्हरमध्ये षटकार किंवा विकेट पडणार यावरही सट्टा लागतो. याशिवाय सेशन म्हणजे 10 ओव्हर. त्यात कोणत्या संघाच्या किती धावा होतील, यावरही सट्टा लावला जातो. एका सेशनमध्ये 70 धावा, असे बुकीने सांगितल्यास त्यावर ‘अप’ किंवा ‘डाऊन’ असे सांगून बोली लावली जाते. सट्टय़ाचे सर्व व्यवहार फोनवरून सतत सुरू असतात. सामना जसजसा पुढे जातो तसतसा रेटमध्येही बदल होतो. एखाद्या संघावर जास्त बोली लागली, अन् त्या दिवशी तोच संघ जिंकला, तर बुकीला तोटा आणि जर कमी बोली लागलेला संघ जिंकला, तर बुकीचा फायदा होतो. एखाद्या संघाचा रेट एकाला 70 असेल आणि तो संघ जिंकला, तर सट्टा लावणार्‍याला लावलेले 1 हजार आणि जिंकलेले 700 असे एकूण 1 हजार 700 रुपये मिळतात. सट्टा लावलेला संघ हरला, तर 1 हजार बुडाले!

सट्टा बाजारात बुकी, एजंट, सबएजंट व सट्टा लावणारे अशी साखळी असते. एजंट किंवा सबएजंट बुकिंग घेऊन बुकीला सारखे कळवत असतात. ज्या साखळीद्वारे पैसे मुख्य बुकीपर्यंत पोहोचतात, त्याच साखळीने पैसे ग्राहकापर्यंत येत असतात. एजंट, सबएजंट यांना बुकिंगच्या 5 ते 10 टक्के कमिशन दिले जाते. आयपीएल फीवर सध्या जोरात सुरू आहे. प्रत्येक सामन्यावर लावल्या जाणार्‍या पैशांत वाढ होत आहे. 12 एप्रिलला दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या सामन्यावर नगरमधून दिल्ली संघावर दोन कोटींचा सट्टा लागला होता. सनराईज विजयी झाल्याने सट्टा लावणार्‍यांचे कोटींचे नुकसान झाले. सटोडिये मात्र मालामाल झाले..