आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावेडी नाट्यगृहाचा मार्ग अखेर झाला मोकळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अनेकवर्षांपासून प्रलंबित असलेला सावेडी नाट्यगृहाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. येत्या १९ जुलैला नाट्यगृहाचे भूमिपूजन होणार आहे. सर्व अडचणी दूर झाल्या आहे. आता नाट्यगृहाच्या कामाला गती देण्यात येणार असल्याचे महापौर अभिषेक कळमकर यांनी सांगितले. एक एकर जागेवर उभे राहणारे हे वातानुकूलित नाट्यगृह शहराच्या वैभवात मोठी भर टाकरणार आहे. दीड वर्षात नाट्यगृहाचे काम पूर्ण होणार आहे.

शहरात नाट्यगृह उभारावे, अशी नाट्यकर्मी नाट्यप्रेमींची मागणी होती. त्यानुसार महापालिकेने सावेडी क्रीडा संकुल येथे नाट्यगृह उभारण्याचा निर्णय घेतला. शासनाकडून त्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. उर्वरित निधी महापालिका देणार आहे.

शासनाकडून ५० लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे नाट्यगृहाचे काम रखडले होते. त्यात क्रीडा संकुलाच्या जागेवरील कच-याची मोठी अडचणी होती. आता हा सर्व कचरा उचलण्यात आला आहे. यापुढे सावेडी उपनगरातील कचरा काटवन खंडोबा परिसरात टाकण्यात येणार आहे. त्यासाठी रॅम्प बांधण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. नाट्यगृहाच्या बांधकामासाठी ठेकेदार संस्थेने स्टिल खरेदी केले आहे. सुरुवातीला ५०० आसन क्षमतेचे नाट्यगृह उभारण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला. त्यासाठी साडेपाच कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. परंतु पदाधिकारी प्रशासनाने ५०० ऐवजी आता एक हजार आसन क्षमता असलेले नाट्यगृह उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सुमारे सात कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

शासनाकडून अनुदान स्वरूपात जास्तीत जास्त निधी मिळवण्याचा प्रयत्न मनपा करणार आहे. सावेडीत एक हजार आसन क्षमतेचे नाट्यगृह उभे राहिल्यानंतर नगर शहराच्या वैभवात भर पडणार आहे. शिवाय शहरातील नाट्यसंस्कृतीला मोठी चालना मिळणार आहे. नाट्यगृहाच्या रखडलेले काम सुरू करण्यासाठी महापौर अभिषेक कळमकर यांनी प्रयत्न केले. कामातील अडचणी दूर करून नाट्यगृहाचे काम सुरू करण्यात त्यांना यश मिळाले आहे. येत्या १९ जुलै रोजी नाट्यगृहाच्या कामाचे विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. दीड वर्षात नाट्यगृहाचे काम पूर्ण करण्याचा कळमकर यांचा मानस आहे.

वातानुकूलित नाट्यगृह
सावेडीनाट्यगृह एक एकर जागेवर उभारण्यात येत असून त्यात सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधा असतील. पार्किंग, कॅन्टीन, स्वच्छतागृह यासह भव्य व्यासपीठ उभारण्यात येईल.एक हजार नाट्यप्रेमींना एकाच वेळी नाटकाचा आनंद घेता येणार आहे.


असे आहे नाट्यगृह
०१ - एकर जागा
१००० - आसन क्षमता
०७ - कोटींचा खर्च

चौकाचे रूपडे बदलणार
सावेडीतील प्रोफेसर कॉलनी चौकाजवळच नाट्यगृह होणार आहे. त्यामुळे चौकाचे रुपडे बदलणार आहे. सावेडीकर मोठ्या संख्येने चौकात खरेदीसाठी येतात. नाट्यगृह झाल्यानंतर येथील बाजारमूल्य वाढणार आहे.

कामात खंड पडणार नाही
नाट्यगृहामुळे शहराच्या वैभवात मोठी भर पडणार आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे नाट्यगृहाचे काम रखडले होते. या अडचणी आता दूर झाल्या आहेत. भूमिपूजनानंतर नाट्यगृहाच्या कामात खंड पडणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल. नाट्यकर्मी नाट्यप्रेमींची अनेक वर्षांची मागणी आता पूर्ण होणार आहे. माझ्या कार्यकाळात नाट्यगृहाचे काम मार्गी लागले, हेच समाधान आहे.'' अभिषेक कळमकर, महापौर