आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावेडी उपकेंद्रासाठीचे साडेपाच कोटी परत?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महावितरणने मोठा गाजावाजा करून केंद्र सरकारच्या द्रूतगती विकास कार्यक्रमांतर्गत (आर-एपीडीआरपी) शहरात विविध विकासकामे केली. सावेडी वीज उपकेंद्रासाठी महावितरणतर्फे जागेचा शोध सुरू आहे. पण त्यांना जागा मिळत नाही. एक जागा मिळाली आहे. मात्र, जागामालक जास्त पैसे मागत असल्याने ती जागा परवडत नाही. सावेडी उपकेंद्रासाठी महापालिका व लोकप्रतिनिधींनी लक्ष घातल्यास हे केंद्र उभे राहील; अन्यथा या केंद्रासाठी आलेला साडेपाच कोटींचा निधी परत जाईल.

शहरातून सर्वाधिक महसूल देणाऱ्या सावेडी विभागात वीज उपकेंद्रासाठी गेल्या दाेन वर्षांपासून जागेचा शोध सुरू आहे. जागेअभावी हे उपकेंद्र रेंगाळले आहे. गुलमोहोर रस्ता, पाइपलाइन रस्ता, मनमाड रस्ता, औरंगाबाद रस्ता, सावेडी गावठाण, सिव्हिल या परिसरात झपाट्याने शहर वाढत आहे. त्यामुळे या परिसरात विजेची मागणीही वाढत आहे. या परिसरात नेहमी विजेची समस्या निर्माण होते. सावेडी परिसरात उपकेंद्र व्हावे, यासाठी आर-एपीडीआरपी योजनेंतर्गत साडेपाच कोटींचा निधी मिळाला होता. मात्र, जागाच निश्चित नसल्याने हा निधी आता परत जाण्याच्या मार्गावर आहे. ‘आर-एपीडीआरपी’ योजनेंतर्गत शहरात नवीन रोहित्र बसवले गेले, जुन्या रोहित्रांची क्षमता वाढवली, नवीन वीजवाहिन्या झाल्या, केडगाव पॉवर हाऊस येथे उपकेंद्र झाले. मात्र, सावेडीचे उपकेंद्र उभे राहू शकले नाही. या उपकेंद्रासाठी महावितरणने पाठपुरावा केल्यानंतर महापालिकेने दोन वर्षांपूर्वी प्रभात बेकरीमागील सुमारे ९३ गुंठ्यांचा खासगी भूखंड आरक्षित केला होता. हा भूखंड आरक्षित केला, त्यावेळी त्याची मालकी महापालिकेकडे होती. मात्र, या भूखंडाचे स्थान शहरातील मोक्याच्या ठिकाणी आहे. म्हणजे भविष्यात हा भूखंड ‘सोन्याची अंडे देणारी कोंबडी’ ठरेल, हे हेरून मनपातील काही बहाद्दरांनी या भूखंडाची कागदपत्रे गहाळ केली. कागदपत्रे उपलब्ध नसल्याने महावितरणला हा भूखंड घेण्यात अडचणी आल्या.
या भूखंडापैकी महावितरणला उपकेंद्रासाठी ३० गुंठेच जागा हवी होती. अखेर तत्कालीन अधीक्षक अभियंता शिवाजी चाफेकरंडे यांनी जुलै २०१२ मध्ये हुंडेकरी लॉनच्या मागे सावेडी उपकेंद्रासाठी जागा निश्चित केली. त्या जागेची पाहणी नाशिकच्या अधिकाऱ्यांनी केली होती. मात्र, त्या जागेला वरिष्ठांनी ‘रेड सिग्नल’ दिला.

महावितरणने पुन्हा सावेडी गावाजवळ उपकेंद्रासाठी जागा निश्चित केली. मात्र, संबंधित जागामालकाने अपेक्षेपेक्षा जास्त भाव सांगितल्याने ती महावितरणने नाकारली. सावेडी उपकेंद्रासाठी महापालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी, यासाठी महावितरणने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. हे उपकेंद्र झाल्यास या परिसरातील विजेचा प्रश्न निकाली निघेल.
‘लिंक लाइन’ही रखडली
शहरात वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रमाण टाळण्यासाठी एमआयडीसी ते सावेडीपर्यंत ‘लिंक लाइन’ टाकण्यात येणार होती. शहरात सोलापूर रस्ता, एमआयडीसी, सावेडी, केडगाव, पॉवर हाऊस या पाच मुख्य वीज वाहिन्या आहेत. या वाहिन्यांपैकी एकाही वाहिनीत बिघाड झाल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत विजेची समस्या उदभवल्यास दुसऱ्या उपकेंद्रावरून पर्यायी व्यवस्था म्हणून या ‘लिंक लाइन’मधून संबंधित भागास वीज पुरवठा करण्यात येईल. त्यासाठी औरंगाबाद रस्ता, मनमाड रस्ता आणि पॉवर हाऊस येथे तीन रोहित्रे बसवण्यात येणार होती. मात्र, वनविभागाने घेतलेल्या आक्षेपामुळे ही योजना रखडली आहे.
...तर कनेक्शन देणार नाही
सावेडी उपकेंद्रासाठी महावितरणने वृत्तपत्रांत तीन वेळा जाहिरात दिली. मात्र, कोणीही जागा देण्यास पुढे आले नाही. एकजण तयार आहे, पण तो अव्वाच्या सव्वा पैसे मागत आहे. लोकप्रतिनिधी, महापालिका, जिल्हाधिकारी मदत करण्याबाबत ठोस भूमिका घेत नाहीत. अगोदरच सावेडी परिसरात सुरळीत वीज पुरवठ्यासाठी मोठी कसरत करावी लागते. काही काळानंतर वीज कनेक्शन मागण्यासाठी ग्राहक आल्यास कनेक्शन देता येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होईल.”
धनंजय भामरे, कार्यकारी अभियंता, महावितरण.
नगरकरांचे नुकसान
सावेडी उपकेंद्र झाले नाही, तर त्यात नगरकरांचे नुकसान आहे. नागरिकांना पुरेशा प्रमाणात वीज मिळणार नाही. आम्हीही जागेसाठी पाठपुरावा केला. मात्र, उपयोग झाला नाही. त्यामुळे या उपकेंद्रासाठी आलेला निधी केंद्राकडे परत जाईल. हे उपकेंद्र झाल्यास सावेडी उपनगराचा १० ते १५ वर्षांचा विजेचा प्रश्न निकाली निघेल. ओव्हरलोड, वारंवार होणारे ब्रेकडाऊन यापासून सुटका होईल. एकाच लाइनवर दोन वाहिन्यांच्या लोडची समस्या राहणार नाही.