आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या अधिकाऱ्यांपुढे टंचाईचे मोठे आव्हान, जिल्हाधिकारी मेहता, आयुक्तपदी गावडे यांची नियुक्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हाभर दुष्काळाच्या झळा तीव्र असताना शासनाने जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल महापालिका आयुक्त विलास ढगे या तीन अधिकाऱ्यांच्या एकाच वेळी बदल्या केल्या आहेत. जिल्हाधिकारीपदी संपदा मेहता, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी रवींद्र बिनवडे महापालिका अायुक्तपदी दिलीप गावडे या तीन अधिकाऱ्यांची शासनाने नव्याने नियुक्ती केली आहे. या तिन्ही अधिकाऱ्यांसाठी जिल्ह्याचे कार्यक्षेत्र नवीन असल्याने त्यांच्यासमोर दुष्काळ निवारणाचे मोठे आव्हान उभे राहणार आहे.

राज्य शासनाने ७३ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यात नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांसह तीन अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी प्रयत्न सुरू केले होते. अवघ्या दोन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी जिल्ह्यातील गाव- खेड्यांशी वेगळे नाते निर्माण केले. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात फिरून नागरिकांचे प्रश्न त्यांनी समजून घेतले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी देखील जिल्हाभर विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले. दुष्काळ निवारणासाठी या दोन्ही अनुभवी अधिकाऱ्यांची जिल्ह्याला गरज होती. मात्र, शासनाने ऐन टंचाई निवारणाच्या काळात या दोन्ही अधिकाऱ्यांसह महापालिका आयुक्त विलास ढगे यांची देखील बदली केली. अाता जिल्हाधिकारी म्हणून संपदा मेहता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रवींद्र बिनवडे, तर महापालिका आयुक्त म्हणून दिलीप गावडे पदभार स्वीकारणार आहेत. मेहता या गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पहात होत्या. आता त्यांच्यावर नगरच्या जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गडचिरोलीहून थेट दुष्काळाने होरपळलेल्या नगर जिल्ह्यात बदली झाल्याने मेहता यांच्यासमोर अनेक आव्हाने उभी राहणार आहेत. जिल्ह्याची माहिती घेण्यासाठीच त्यांना काही दिवस लागणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार घेणारे बिनवडे यांच्यासमोरही अशीच आव्हाने उभी राहणार आहेत. त्यांच्यासाठी देखील नगर जिल्हा नवीन आहे. हे दोन्ही अधिकारी जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी कितपत प्रयत्न करतात, ते लवकरच स्पष्ट होईल.

महिला जिल्हाधिकाऱ्यांचा मिळाली कमी कार्यकाळ
नगरच्या चौथ्या जिल्हाधिकारी म्हणून संपदा मेहता दोन दिवसांत रूजू होणार आहेत. यापूर्वी ए. बागची, मेधा गाडगीळ रूबल अग्रवाल यांनी महिला जिल्हाधिकारी म्हणून काम केलेले आहे. परंतु मेधा गाडगीळ यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाळ वगळता बागची अग्रवाल यांना कमी कार्यकाळ मिळालेला आहे. बागची यांनी २९, तर अग्रवाल यांनी अवघे सात दिवस जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. आता महिला जिल्हाधिकारी म्हणून मेहता नव्याने रूजू होत आहेत.

मेहता दोन िदवसांत रूजू होणार
जिल्हाधिकारीम्हणून रूजू होणाऱ्या संपदा सुरेश मेहता या सध्या गडचिरोली येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. गेल्या दोन वर्षांपासून त्या या पदावर कार्यरत आहेत. गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या मेहता आता नगरच्या जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. नगरच्या जिल्हाधिकारी म्हणून येत्या दोन दिवसांत पदभार घेणार असल्याचे मेहता यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना स्पष्ट केले.

चौथ्या महिला जिल्हाधिकारी
नगरच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारीपदाचा मान ए. बागचा यांना मिळाला. त्या डिसेंबर १९७६ ते जानेवारी १९७७ या २९ दिवसांच्या कालावधीत जिल्हाधिकारी होत्या. त्यांच्यानंतर १९९५ मध्ये मेधा गाडगीळ यांनी जिल्हाधिकारी म्हणून कारभार पाहिला. फेब्रुवारी २०१४ मध्ये रूबल अग्रवाल या केवळ सात दिवसांसाठी जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. आता संपदा मेहता जिल्हाधिकारी म्हणून रूजू होत आहेत.

मनपाला मिळाला प्रथमच आयएएस अधिकारी
महापालिकेचे आयुक्त विलास ढगे यांची वर्षभराच्या आत बदली झाली आहे. त्यांच्याजागी गांेदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे पदभार स्वीकारणार आहेत. गावडे यांच्या रूपाने नगर महापालिकेला प्रथमच आयएएस दर्जाचा अधिकारी मिळणार आहे. अार्थिक संकटात सापडलेल्या महापालिकेला सावरण्यासाठी नवीन आयुक्त गावडे कोणत्या उपाययोजना करणार, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.