आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टंचाईचा आढावा सभा बोलावण्याकडे दुर्लक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पाऊसलांबल्याने जिरायत भागातील खरीप हंगाम वाया गेला आहे. बागायती भागातील विहिरींनीही तळ गाठला आहे. त्यामुळे चारा पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत पशुधन वाचवून पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांनी पुढाकार घेऊन महसूल विभागासह संयुक्त विशेष टंचाई आढावा सभा बाेलावण्याची गरज आहे. पण पदाधिकाऱ्यांना याचे काहीच देणे-घेणे नसल्याने सामान्य जनतेला मात्र हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

जिल्ह्यात सध्या गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने ज्या ठिकाणी पेरणी झाली, तेथील पिके पावसाअभावी शेवटच्या घटका मोजत आहेत. अनेक ठिकाणी पेरण्याच होऊ शकलेल्या नाहीत. विहिरींनी तळ गाठला आहे. कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. अशा परिस्थितीत टँकरचाच आधार ग्रामीण जनतेला आहे. पिकेही गेली, आता पशुधनही जाईल. त्याची चिंता वाढली आहे.

टंचाई कालावधीत तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषद विशेष आढावा सभा बोलावत असते. स्थानिक पातळीवर जनता जवळचा लोकप्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषद सदस्याकडे दाद मागते. पण टंचाईच्या उपाययोजनांबाबत ‘हातात पदरात’ अशी अवस्था सदस्यांची झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने महसूल विभागासह संयुक्त टंचाई आढावा विशेष सभा बोलावावी, अशी मागणी सदस्यांमधून होत आहे. पण जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात सध्या, तरी कोणताही निर्णय घेतलेला नाही. सरकारने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले, आता पशुधनही पाणी आणि चाऱ्यावाचून मरू द्यायचे का? असा सवाल शेतकरी करत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेने तातडीने संयुक्त विशेष टंचाई आढावा सभा बोलावावी, अशी मागणी होत आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा गुंड यांची भूमिका या प्रश्नी महत्त्वाची मानली जात आहे.

जिल्हा परिषदेने यापूर्वी बोलावलेल्या टंचाई विशेष सभांना महसूल अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते. पण महसूल अधिकाऱ्यांनी या महत्त्वपूर्ण सभेकडे पाठ फिरवून आपल्याला काहीच देणे-घेणे नसल्याचा संदेश त्यावेळी दिला होता. त्यानंतर सर्वसाधारण सभेत या अधिकाऱ्यांविरोधात ठराव करण्यात आला. हा वाद अधिक विकोपाला जाऊ लागल्याने विभागीय आयुक्तांना जिल्हा परिषदेत येऊन आढावा सभा घ्यावी लागली. हा अनुभव पाठीशी असतानाही मागील वर्षी बोलावण्यात आलेल्या विशेष सभेकडे पुन्हा एकदा महसूलने पाठ फिरवली होती. त्यामुळे आता संयुक्त बैठक बोलावल्यास महसूल अधिकारी आलेच नाहीत, तर काय भूमिका घ्यायची, असा प्रश्न जिल्हा सदस्यांना पडला आहे.

पेरणी वाया जाणार
कर्जततालुक्यातील काही भागात २० दिवसांपासून पाणी नाही. पहिल्या पेरणीचे पीक वाया गेले. आता दुबार पेरणीला पाऊस नाही. पशुधन धोक्यात आले. त्यामुळे तातडीने विशेष टंचाई आढावा सभा बोलावण्याची गरज आहे. त्यासाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनाही बोलवावे.'' राजेंद्रफाळके, सदस्य, जिल्हा परिषद.

सभा बोलवा, प्रश्न गंभीर
टंचाईस्थिती निर्माण झाल्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा गुंड यांनी विशेष टंचाई आढावा सभा बोलवावी. या सभेला महसूल अधिकाऱ्यांनाही बोलावण्यात यावे. पाऊस लांबल्याने भीषण परिस्थिती उदभवली असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.'' परमवीरपांडुळे, सदस्य, जिल्हा परिषद.

महसूलचा अनुभव वाईट
टंचाईकालावधीत जिल्हा परिषदेत विशेष टंचाई आढावा सभेला आमंत्रण देऊनही महसूलचे अधिकारी उपस्थित रहात नाहीत. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांच्या कार्यकाळात असाच प्रकार घडल्याने त्यावेळी थेट आयुक्तांना जिल्हा परिषदेत येऊन सभा घ्यावी लागली होती. त्यानंतरही आयोजित सभांना असाच वाईट अनुभव आल्याने सदस्य पदाधिकारी महसूलच्या कारभारावर नाराज आहेत.

महसूल अधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे
मृगनक्षत्रातील पावसावर पेरण्या झाल्या, पण पावसाअभावी पीक वाया गेले. आता चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. महसूल अधिकाऱ्यांसमवेत सभा बोलावण्याची गरज आहे. जनतेच्या भावनांचा विचार करून महसूलच्या अधिकाऱ्यांनीही या सभेला उपस्थित रहावे. ते अधिकारी असतील, तरच सभेला अर्थ राहील. यासंदर्भात अध्यक्ष मंजूषा गुंड यांच्याशी आपण चर्चा करू.'' विठ्ठललंघे, माजी जि. प. अध्यक्ष, तथा सदस्य.
बातम्या आणखी आहेत...