आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांच्या पंखात बालभवनने दिले बळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे इच्छाशक्ती असूनही त्यांना शिकण्यासाठी कसरत धडपड करावी लागते. अशा मुलांनी कठोर परिश्रम करून बालभवनच्या साथीने दहावी बारावीचा टप्पा यशस्वीपणे पार केला, असे प्रतिपादन मास्टर माइंड करिअर अॅकॅडमीचे संचालक अमोल सायंबर यांनी केले. बालभवनच्या मदतीने दहावी बारावी परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मास्टर माइंड अॅकॅडमीचे संचालक मारुती शेळके, अमोल सायंबर, पालक प्रतिनिधी राम वडागळे, स्नेहालयाचे सहसंचालक हनिफ शेख, स्वयंसेवक आशिष भाबडा उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते गुणवंत मुलांना सन्मानपत्र, गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी नीलेश वैरागर इतर विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. स्पर्धा परीक्षा करिअर, दहावी बारावीनंतर काय याविषयी मारुती शेळके यांनी खास शैलीत मुलांना मार्गदर्शन केले.

यंदा बालभवनची ७३ मुले दहावीच्या परीक्षेला, तर बारावीच्या परीक्षेला ४२ मुले बसली होती. दहावीत ६८, तर बारावीत ३८ मुले चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. शहरातील सात झोपडपट्ट्यांमधून दहावीच्या परीक्षेत पवन भवर ८३ टक्के गुण मिळवून प्रथम आला. तो उन्नती बालभवनचा विद्यार्थी आहे. अभिषेक गवळी ८२ टक्के मिळवून द्वितीय आला. तो ऊर्जा बालभवनचा विद्यार्थी आहे. मुक्ता आनंद लोखंडे ८१ टक्के मिळवून तृतीय आली. ती उत्कर्ष बालभवनची विद्यार्थिनी आहे. बारावीच्या परीक्षेत हर्षदा गोले ८० टक्के मिळवून प्रथम (परिस बालभवन), शुभांगी भंडारे ७१ टक्के मिळवून द्वितीय (सहारा बालभवन), तर स्वाती चिप्पा ६८ टक्के मिळवून तृतीय (क्षितिज बालभवन) आली.

इतर विद्यार्थी ५५ ते ६५ टक्के मिळवून उत्तीर्ण झाले. मुलांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्यात निकोप स्पर्धा असावी, भविष्यात कोणकोणत्या करिअरच्या संधी आहेत, याविषयीची माहिती बालभवनचे संचालक संजय बंदिष्टी यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हनिफ शेख यांनी, तर आभार प्रदर्शन शबाना शेख यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयटी सेंटरचे संदीप क्षीरसागर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी वसीम मौलवी, रुबिना शेख, जयश्री शिंदे, वीणा वड्डेपेल्ली, राजू पांढरे, उषा खोल्लम, निलोफर शेख आदी प्रयत्नशील होते.
मास्टर माइंड अॅकॅडमीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी बालभवनचे कार्यकर्ते उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...