आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांच्या पाठीवर पालकांच्या दुराग्रहाचे ओझे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- शिक्षण अधिकाधिक आनंददायी व्हावे, यासाठी शिक्षणतज्ज्ञ सातत्याने संशोधन करून तशा सूचना देतात. विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करावे, असे तज्ज्ञांचे स्पष्ट मत आहे. मात्र, नगरमधील जवळजवळ 90 टक्के शाळांत जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे वाढत आहे. ‘दिव्य मराठी’ने सोमवारी शहरातील विविध शाळांमध्ये पाहणी करून विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन मोजले असता चौथीच्या विद्यार्थ्याच्या दप्तराचे ओझे दहा किलोंपर्यंत भरले. अभ्यासापेक्षा विद्यार्थी कसे ओझ्याचे बैल झाले आहेत, याचे विदारक वास्तव समोर आले. शिक्षणाऐवजी या विद्यार्थ्यांना आताच पाठीची व गुडघ्यांची दुखणी सुरू झाली आहेत.

संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमीत कमी असावे, अशीच त्यांची भूमिका आहे. परंतु विद्यार्थ्यांच्या पालकांच्या दुराग्रहामुळे दप्तराचे ओझे वाढत असल्याचे मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे.

स्पध्रेच्या युगात आपल्या मुलाने सर्वांच्या पुढे असावे, अशीच प्रत्येक पालकाची अपेक्षा असते. ही अपेक्षा पूर्ण करताना ते मुलांच्या शाळेच्या दप्तरावर ओझे टाकत आहेत. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने शहरातील वेगवेगळ्या शाळांतील वेगवेगळ्या वर्गांतील विद्यार्थ्यांच्या दप्तराची पाहणी केली. पहिलीपासून चौथीच्या विद्यार्थ्यांंच्या दफ्तराचा त्यात समावेश होता. हे वय बागडण्याचे असते. पण इतके ओझे पाठीवर घेऊन हे विद्यार्थी बागडणे तर सोडाच, पण नीट चालूही शकत नाहीत, अशी स्थिती आहे.

ताणकाट्याद्वारे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन मोजले असता धक्कादायक प्रकार समोर आला. प्रत्येक विद्यार्थी आपल्या पाठीवर दररोज आठ ते दहा किलो वजनाच्या दप्तराचे ओझे वाहत असल्याचे या पाहणीतून स्पष्ट झाले.

आपल्या मुलाला कोणत्याच शालेय साहित्याची कमतरता भासू नये, या भ्रमात पालक मुलांच्या दप्तरात अनेक अनावश्यक साहित्य खचाखच भरण्याचा अट्टहास धरतात. प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांंना दप्तराचे वेळापत्रक ठरवून दिले, त्याची छापील प्रतही देण्यात आली आहे. शाळेत येताना केवळ आवश्यक पुस्तकेच आणावीत, हा एकमेव उद्देश त्यामागे आहे. परंतु वेळापत्रक धाब्यावर बसवून पालकच मुलांचे दप्तर भरत असल्याने चिमुकल्यांच्या पाठीवरील भार वाढत आहे. त्यामुळे हजारो निरागस मुलांना दररोज आठ-दहा किलो वजनाच्या दप्तराचे ओझे वागवावे लागत आहे. त्यामुळे अनेकांना खेळण्या-बागडण्याच्या वयातच पाठीच्या दुखण्याला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ‘आनंददायी शिक्षण’ ही संकल्पनाच मोडीत काढण्यात आली आहे.

शहरातील 123 शाळांमध्ये 1 ली ते 7 वी च्या वर्गात 34 हजार 715 विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यापैकी बहुसंख्य विद्यार्थ्यांंच्या पाठीवर दररोज दप्तराचे ओझे लादण्यात येते. विद्यार्थ्याच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करावे, अशा सूचना शिक्षण विभागाने प्रत्येक शाळांना देण्यात आल्याची माहिती समजली. परंतु अनेक शाळांनी या सूचनांना केराची टोपली दाखवत पालकांकडे बोट दाखवले. दप्तराचे ओझे कमी करण्याची जबाबदारी आमची नसून पालकांची आहे, असा पवित्रा शाळांनी घेतला आहे. पालक मात्र याबाबत बोलण्यास तयार नाहीत. त्यामुळे मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी कसे होणार, हा प्रश्न कायम आहे.

पालकांनी उपक्रम बंद पाडला
आठवड्यातून एक दिवस शनिवारी ‘दप्तराविना शाळा’ हा चांगला उपक्रम दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आला होता. त्यास विद्यार्थ्यांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला, परंतु अनेक पालकांनी त्यावर आक्षेप घेतला. आमची मुले दप्तराविना शाळेत आली, तर ती बेशिस्त होतील, असे कारण पुढे करत काही पालकांनी उपक्रम बंद पाडण्यास भाग पाडले. पालकांनी पुढाकार घेतला, तर विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी होईल. त्यासाठी पालकांच्या प्रबोधनाची गरज आहे.’’ प्रकाश गरड, मुख्याध्यापक, बाई इचरजबाई फिरोदिया प्रशाला.

पालकांच्या दुर्लक्षामुळे ओझे वाढले
प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेमार्फत छापील वेळापत्रक देण्यात आले आहे. दप्तराचे ओझे कमी करणे, हा त्यामागील उद्देश आहे. शाळेत येताना त्या दिवसापुरतेच दप्तर आणले, तर ओझे आपोआप कमी होईल. परंतु तसे होत नाही. विद्यार्थी आवश्यक नसलेले दप्तर शाळेत घेऊन येतात. विद्यार्थ्यांना वेळापत्रकाप्रमाणे दप्तर देणे ही पालकांची जबाबदारी आहे. पालकांच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थी नाहक दप्तराचे ओझे वाहतात.’’ अलका जोशी, मुख्याध्यापिका, रेणावीकर विद्यालय.

डब्याच्या पिशवीतही पाण्याचे ओझे..
हे फक्त दप्तराचे ओझे होते. विद्यार्थ्यांच्या डब्याची पिशवी वेगळी होती. तिचे वजनही एक किलोच्या दरम्यान होते. त्यात पाण्याच्या बाटलीचे वजनही अधिक होते. मुळात पिण्याचे पाणी घरून आणण्याची गरज का पडावी, या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. कारण सर्व शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. नगरमधील पालक अधिक जागरूक झाले, की घाबरट असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

एकच वही आवश्यक
चौथीपर्यंत केवळ एकच वही आवश्यक आहे. दुरेघी, चार रेघी व गणितासाठी चौकटी अशी सुविधा एकाच वहीत उपलब्ध आहे. परंतु पालक प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र वही खरेदी करतात. शिवाय मोठी कंपास, गरजेपेक्षा जास्त पेन व पेन्सिल, पाण्याची बाटली असे अनावश्यक ओझे विद्यार्थ्यांवर लादले जाते. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझ्याची आम्हाला काळजी वाटते. पालक मात्र त्याकडे दुर्लक्ष करतात.’’ उषा परदेशी, मुख्याध्यापिका, सर्मथ विद्या मंदिर प्रशाला