आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुस्तकांतील चुकांमुळे साहित्य विक्रेत्यांना फटका

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - उन्हाळ्याची सुटी संपून शाळा सुरू होण्याचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील पाठय़पुस्तकांच्या दुकानांत पालक व विद्यार्थ्यांनी खरेदीसाठी गर्दी केली आहे. मात्र, पाठय़पुस्तकांतील चुकांमुळे मागील वर्षीची शिल्लक पुस्तके रद्दीत विकण्याची वेळ दुकानदारांवर आली आहे. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

शालेय, तसेच महाविद्यालयीन अभ्यासक्रमांत बदल होत असल्याने व्यावसायिकांना मागील वर्षीच्या शिल्लक पुस्तकांची विक्री करता येत नाही. परिणामी लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. 2013-2014 या शैक्षणिक वर्षात दहावी, बारावी, तसेच विविध महाविद्यालयीन प्रथम वर्षाचे अभ्यासक्रम बदलले आहेत. वाढत्या महागाईची झळही पाठय़पुस्तकांना बसली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत 25 टक्के किमती वाढल्या आहेत.

तर पुस्तके सवलतीच्या दरात
वारंवार अभ्यासक्रम बदलल्यामुळे जुन्या अभ्यासक्रमांच्या पुस्तकांची रद्दी होते. आठवीपर्यंतची पुस्तके मोफत असल्याने त्याचाही फटका दुकानदारांना बसला आहे. शासनाने आमची रद्दी परत घेतली, तर पुस्तके सवलतीच्या दरात विकता येतील.’’ राजेंद्र गायकवाड, पुस्तकविक्रेता.

शालेय साहित्यासाठी फी
काही खासगी शाळांमध्ये शाळेतूनच पाठय़पुस्तके व शालेय साहित्य घेण्याची सक्ती केली जाते. त्यासाठी पाच हजार रुपये घेतले जातात. पालकांची ही आर्थिक पिळवणूक आहे. वह्या व पुस्तकांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने आर्थिक गणित कोलमडते.’’ हेमा कोरेरा, पालक.