आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षेत्रभेटीच्या नावाखाली घुलेवाडी येथील शाळेला दिली सुटी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर - क्षेत्रभेटीच्या नावाखाली थेट शाळेची वेळ बदलून शाळेला सुटी देण्याचा प्रकार संगमनेर तालुक्यात समोर आला. पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते व विषयतज्ज्ञ शिक्षकांच्या भेटीत तालुक्यातील घुलेवाडी येथील शाळेला टाळे आढळल्यानंतर ही गंभीर बाब समोर आली. संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांच्या पुढाकारातून चालू शैक्षणिक वर्षांसाठी करण्यात आलेल्या शैक्षणिक नियोजनाला तालुक्यातील शिक्षकांकडून हरताळ फासला जात आहे. 21 कलमी उपक्रमातील शैक्षणिक दीपस्तंभ मार्गदर्शिकेचे पालन करण्याऐवजी शिक्षकांचे स्वत:च्या इच्छेप्रमाणे काम सुरू असल्याचे पुढे आल्याने शिक्षण क्षेत्रात या प्रकाराची चर्चा सुरू झाली आहे. अधिकाºयांचे तालुक्यातील शाळांवरील नियंत्रण सैल झाल्याने शिक्षकांची मनमानी सुरू असल्याचे दिसते. नवाल यांनी जिल्ह्यातील अनेक उपक्रमशील शिक्षक व शाळांनी स्वयंस्फूर्तीने अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. त्यात एकसमानता व एकसूत्रीपणा येण्यासाठी उपक्रमशील शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी यांचा कार्यगट तयार करण्यात आला. त्यातून काही समान व किमान उपक्रम ‘दीपस्तंभ’ मार्गदर्शिकेमध्ये निवडले गेले आहेत.
पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते सरूनाथ उंबरकर व विषयतज्ज्ञ शिक्षक रणदिवे हे दोघेजण शुक्रवारी (18 जुलै) घुलेवाडी गटातील जिल्हा परिषदेच्या शाळांना सदिच्छा भेटीसाठी गेले होते. काही शाळांची भेट करत हे दोघेजण दुपारी एकच्या सुमारास घुलेवाडीच्या शाळेवर गेले असता तेथे त्यांना शाळेच्या वर्गखोल्यांना, प्रवेशद्वाराला कुलूप लावल्याचे आढळले. तसेच शाळेच्या फलकावर दिनविशेषमध्ये 21 कलमी कार्यक्रमांतर्गत ‘राजहंस दूध संघ येथे क्षेत्रभेट’ असे लिहिल्याचे आढळले. जवळच्याच पाणी भरणाºया एका मुलीकडे केलेल्या चौकशीत गंभीर वास्तव पुढे आले. शाळेच्या शिक्षकांनी सकाळीच आठ वाजता शाळा बोलावून आम्हाला दूध संघात नेले व आल्यानंतर पोषण आहार देऊन शाळा सोडून दिली. संबंधितांनी शेजारी असलेल्या अंगणवाडीत चौकशी केली असता त्यांना हीच माहिती मिळाली. शाळा साडेअकरा वाजता सोडून दिल्याचे कळाले. त्यानंतर उंबरकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, जिल्हा शिक्षण अधिकारी, गटविकास अधिकारी भुपेंद्र बेडसे, गटशिक्षणाधिकारी वसंत जोंधळे यांच्याकडे तक्रार केली.
मुख्याध्यापकाला निलंबित करा
घुलेवाडी शाळेतील शिक्षकांनी मुख्याधिकारी, जिल्हा शिक्षणाधिकाºयांच्या आदेशाचे उल्लंघन केले. त्यामुळे संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी.’’
सरूनाथ उंबरकर, विरोधी पक्षनेते, पंचायत समिती.
अहवालानंतर कारवाईचा निर्णय
घुलेवाडीच्या शाळेतील शिक्षकांनी सकाळी शिवारफेरी कार्यक्रम घेत राजहंस दूध संघाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी साडेअकरा वाजता शाळा सोडून दिली. यासंदर्भात सोमवारी विस्तार अधिकाºयाकडे चौकशी सोपवली जाणार आहे. त्यांचा सविस्तर चौकशी अहवाल आल्यानंतर कारवाईसंदर्भात निर्णय घेतला जाईल.’’
वसंत जोंधळे, गटशिक्षण अधिकारी.
अधिका-याला कल्पना न देता शाळेच्या वेळेत परस्पर बदल
शैक्षणिक दीपस्तंभ मार्गदर्शिकेनुसार कृषिदिनाच्या पार्श्वभूमीवर 1 जुलैला क्षेत्रभेट कार्यक्रम होता. 18 जुलैला अण्णा भाऊ साठे स्मृतिदिन होता. परिपाठात त्यांच्या जीवनकार्याची माहिती देणे अपेक्षित असताना शाळेने 1 जुलैचा कार्यक्रम शुक्रवारी (18 जुलै) घेतला. याशिवाय कोणत्याही अधिकाºयाला कल्पना न देता शाळेच्या वेळेत परस्पर बदल केल्याचे समोर आले. गटविकास अधिकारी भुपेंद्र बेडसे यांनी यासंदर्भात संबंधितांची चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले.