आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नऊ शाळांना नाही खेळांसाठी मैदान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण व खेळाविषयी आवड निर्माण व्हावी, यासाठी शाळांना मैदाने असणे आवश्यक आहे. तसा नियमही आहे. तथापि, नगर शहरातील नऊ शाळांना स्वत:ची मैदानेच नाहीत. ‘दिव्य मराठी’ने केलेल्या पाहणीत हे वास्तव आढळून आले.

शाळेच्या मान्यतेसाठी मैदानासह इतर अकरा निकषांची पूर्तता करावी लागते. परंतु प्रशासनाने याकडे डोळेझाक करीत मैदाने नसलेल्या शाळांना काही मान्यता दिली आहे. शाळा मान्यतेसाठी मैदानाची अट असताना या शाळा कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शाळांच्या वेळापत्रकात आठवड्यात दोन ते चार तास खेळाचे असतात, पण मैदानच नसल्याने खेळायचे कुठे, असा प्रश्न मुलांना पडतो. काही शाळा दुसर्‍या मैदानांवर मुलांना घेऊन जातात.

‘आरटीई’ कायद्यांतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या मान्यतेसाठी अकरा निकषांनुसार दर तीन वर्षांनी तपासणी करण्यात येणार आहे. त्यात क्रीडांगण, मुख्याध्यापकांचे कार्यालय, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सोय, ग्रंथालय, अध्ययन व अध्यापन साहित्य, शाळेला कुंपण, स्वयंपाकगृह या निकषांचा समावेश आहे. यातील सर्व निकष नसल्याने नगर शहरातील 37 शाळांची मान्यता धोक्यात आली आहे. याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने समिती स्थापन करून पुन्हा एकदा निकषांची तपासणी सुरू केली आहे. निकष पूर्ण न करणार्‍या शाळांची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात येणार आहे.

या शाळांना स्वत:चे मैदान नाही..
सर्मथ विद्यामंदिर (सांगळे गल्ली)
सविता रमेश फिरोदिया प्रशाला
बाई इचरचबाई फिरोदिया प्रशाला
रामचंद्र सबलोक प्राथमिक शाळा
महंत सुच्चासिंग विद्यालय
मार्कंडेय हायस्कूल
बत्तीन पोट्यांन्ना प्रायमरी स्कूल
सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय
अभिनव बालविकास मंदिर

काय म्हणतात शाळांचे मुख्याध्यापक
लहानग्यांना इतरत्र कसे नेणार?
काही खेळ शाळेतल्या प्रांगणात घेतले जातात. इतर मैदानी खेळांसाठी भाऊसाहेब फिरोदिया शाळेच्या मैदानावर मुलांना नेले जाते. लहान विद्यार्थ्यांना इतर मैदानांवर नेणे अडचणीचे ठरते, पण आम्हांला पर्याय नाही.’’ प्रकाश गरड, मुख्याध्यापक, बाई इचरजबाई फिरोदिया विद्यालय

जिल्हा क्रीडा संकुलात खेळ
शाळेला मैदान नसल्यामुळे शारीरिक शिक्षणाच्या तासांमध्ये विद्यार्थ्यांना जिल्हा क्रीडा संकुलात खेळायला पाठवतो. शाळेच्या नवीन इमारतीचे काम सुरु होणार आहे. तेथे मैदानासह शाळेची सुसज्ज इमारत उभारण्यात येणार आहे.’’ सुनीता पालवे , मुख्याध्यापिका, सावित्रीबाई फुले विद्यालय

खेळाच्या तासात संगणक शिक्षण
आठवड्यातील शारीरिक शिक्षणाचे चार तास असतात. त्यातले दोन तास संगणक शिक्षणाकरिता वापरतो. उरलेले दोन तास शनिवारी संस्थेच्या माध्यमिक विभागाच्या मैदानावर शारीरिक शिक्षणाचा तास घेतला जातो. ’’ विजयकुमार गुगळे, मुख्याध्यापक, सविता रमेश फिरोदिया प्रशाला.