आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी मोठे ‘टेंडर’ - दहातोंडे यांचा गौप्यस्फोट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - प्राथमिक शिक्षकांच्या निवृत्तीसह इतर कारणांनी जिल्ह्यात सुमारे 250 जागा रिक्त होणार आहेत. या जागांवर नवीन भरती करण्याऐवजी इतर जिल्ह्यांतून आंतरजिल्हा बदलीने कर्मचारी नियुक्त करण्याचा घाट घातला जात आहे. आंतरजिल्हा बदल्यांत अर्थकारण होणार असून मोठे ‘टेंडर’ निघणार आहे, असा गौप्यस्फोट जिल्हा परिषद सदस्य संभाजी दहातोंडे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केला.

जिल्ह्यातील अनेक शिक्षक इतर जिल्हा परिषदांतर्गत शाळांमध्ये कार्यरत आहेत. आंतरजिल्हा बदलीने त्या शिक्षकांना नगर जिल्ह्यात आणावे, असा आग्रह काही शिक्षक संघटनांकडून धरला जात आहे. पटसंख्येनुसार शिक्षक निश्चिती केली जाते. त्यातच शैक्षणिक क्षेत्रातही मोठी स्पर्धा वाढल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पट घसरत आहे. त्यामुळे अनेक शिक्षक अतिरिक्त होऊन त्यांचे समायोजन करण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे. अशा परिस्थितीत इतर जिल्ह्यांतून नगर जिल्ह्यात शिक्षकांना सामावून घेण्यात अडचणी येत आहेत.

दोन दिवसांपूर्वी रिक्त असलेल्या पदवीधरांच्या 634 जागांसाठी पदोन्नती प्रक्रिया राबवण्यात आली. अनेकांनी नकार दिल्याने 66 जागा रिक्त राहिल्या. या जागांसह दरवर्षी सेवानिवृत्ती व इतर कारणांनी रिक्त होणा-या सुमारे 250 जागा भरण्याचे नियोजन जिल्हा परिषदेत सुरू आहे, याकडे ‘दिव्य मराठी’ने मंगळवारी लक्ष वेधले होते. या पार्श्वभूमीवर दहातोंडे यांनी शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
जिल्हा परिषदेच्या पदाधिका-यांची भूमिका महत्त्वाची
सन 2010 मध्ये राबवलेल्या भरती प्रक्रियेतील सुमारे दीड ते दोन हजार उमेदवार अजूनही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. रिक्त जागांचा अहवाल पाठवताना जिल्हांतर्गत बदली करावी, असा आग्रह काही शिक्षक संघटनांनी धरला आहे. आंतरजिल्हा बदल्या झाल्या, तर बेरोजगारांना संधी मिळणे कठीण होईल. त्यामुळे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी या गंभीर प्रश्नावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.