आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दप्तर, डबा, गृहपाठही नाही.. तरीही घडतेय भावी पिढी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- पाठीवर दप्तराचे ओझे नाही, हातात टिफिन नाही, गृहपाठ करण्याची गरज नाही.. अशी मुलांना स्वप्नवत वाटणारी शाळा म्हणजे वडगाव गुप्ताजवळील नॅशनल गॅलॅक्सी स्कूल. नो सॅक, नो टिफिन, नो होमवर्क या संकल्पनेची जिल्ह्यातील ही एकमेव शाळा आहे. त्यामुळे मुलांसह पालकांना कुठल्याही प्रकारची काळजी नसते. या ठिकाणी आनंदी व उत्साही वातावरणात मुले शिक्षण घेतात.

विद्यार्थ्यांना घरीदेखील पुस्तकांची गरजच नाही. शाळेने तयार केलेल्या वर्कशीटवर मुलांचा अभ्यास घेतला जातो. संगणक प्रशिक्षण कार्यक्रमाच्या आधारे शिक्षण पद्धत राबवली जाते. प्रत्येक वर्गात स्क्रीन आहे. मुलांची पुस्तके, क्लास वर्कची वही वर्गामध्येच ठेवलेली असते. मुलांनी केलेला अभ्यास वर्कशीटमार्फत पालकांपर्यंत पोहोचवला जातो. मुलांना शिकवलेल्या अभ्यासक्रमाचा सराव शाळेतच शिक्षक करून घेतात. सरावाचे वर्कशीट तपासून पालकांपर्यंत पोहोचवले जाते. मुलांच्या डब्यासाठी सकाळी शिजवलेल्या अन्नाची पौष्टिकता मधल्या सुटीपर्यंत कमी होते, हे टाळण्यासाठी संस्थेतर्फे मुलांसाठी शाळेतच जेवण तयार करण्यात येत असते. त्यामुळे सर्व मुलांना एकसारखे, एकाच वेळी गरम जेवायला मिळते. जेवण व नाष्ट्यासाठीचे पदार्थ ठरवताना पौष्टिकतेकडे लक्ष दिले जाते. शालेय शिक्षणासह मुलांना ज्युदो, तायक्वांदो, योगा, बेसिक जिन्मॅस्टिक, अँरोबिक्स, स्वीमिंग, रोप मल्लखांब, स्केटिंग, संगीत, नृत्य, आर्ट व क्राफ्ट आदी खेळांचे प्रकार शिकवले जातात. दिवसातील एक तास मुले मैदानावर खेळतात. या शाळेतील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरापर्यंत झेप घेतली आहे.

सुजाण नागरिक घडवण्यासाठी..
व्यवस्थापनाच्या डोक्यामध्ये पूर्ण वेळ शाळेचा विचार असतो. नव्या सुधारणा करण्याच्या संकल्पना यातूनच पुढे येतात. नकळत्या वयापासून मुलांवर संस्कार करून सुजाण नागरिक बनवण्याचे आमचे ध्येय आहे. मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात.दप्तराचे ओझे कमी केले, तर मुले नैसर्गिकरीत्या जास्त शिकतील व समृद्ध होतील. त्यासाठी शाळेत मुलांकडून अभ्यास करून घेतला जातो. वर्कशीटच्या माध्यमातून अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली. यासाठी माझी व शिक्षकांची पूर्ण तयारी आहे. शासनाने सुरू केलेली आनंददायी शिक्षण योजना परिपूर्ण आहे; परंतु ती तंतोतंत राबवली जात नाही. त्यापूर्वीच आम्ही हा उपक्रम सुरू केला.’’ उषा देशमुख, संचालिका, दीपक देशमुख मेडिकल अँड एज्युकेशनल फाउंडेशन.