आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरच्या जागेसाठी आघाडीत साठमारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरच्या जागेसाठी आघाडीत कलगीतुरा रंगात येत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांतील अंतर्गत कलहही यानिमित्ताने पुढे येत आहे. ही जागा काँग्रेसकडेच असल्याचे मुख्यमंत्र्यांकडून वदवून घेण्याची कसरत करणा-या स्थानिक पदाधिका-यांना जागेच्या अदलाबदलीची भीती आहे. ताकद वाढल्याचे सांगत राष्ट्रवादीकडून ही जागा पदरात पाडून घेण्याचे जोरदार प्रयत्न सध्या सुरू आहेत.

गेल्या 25 वर्षांपासून नगर शहर विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. आमदार अनिल राठोड सहाव्या वेळी निवडून येत डबल हॅट्ट्रिक करण्याच्या तयारीला लागले आहेत. शिवसेनेने विद्यमान आमदारांना उमेदवारी देण्याचे निश्चित केल्याने पक्षांतर्गत विरोधकांपासून ते निश्चित झाले आहेत. सन 1999 च्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे ही जागा लढवली होती. त्यानंतरच्या 2004च्या निवडणुकीत श्रीगोंदे मतदारसंघातील पेच सोडवण्यासाठी नगरची जागा राष्ट्रवादीकडे आली. शिवाजीराव नागवडे यांना श्रीगोंद्यामधून काँग्रेसने त्यावेळी उमेदवारी दिली होती. राष्ट्रवादीचे बबनराव पाचपुते यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागली. श्रीगोंदे मतदारसंघाचा तिढा 2009 च्या निवडणुकीत सुटला व ही जागा राष्ट्रवादीकडे आली. त्यामुळे पुन्हा नगरची जागा काँग्रेसच्या वाट्याला आली.

नगरच्या जागेवरून यावेळीही काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू झाली आहे. ताकद वाढल्याचे सांगत ही जागा राष्ट्रवादीकडे घेण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. महापौर संग्राम जगताप यांना उमेदवारी देत मतदारांसमोर जाण्याची गणिते आखली जात आहेत. त्यातच राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनीही उमेदवारीच्या रिंगणात उडी घेत जगताप यांना आव्हान दिले आहे.

राष्ट्रवादीच्या आक्रमक पवित्र्यासमोर काँग्रेसने जागा आमचीच असल्याचा सूर स्थानिक पातळीवर आवळला. मात्र, त्याचा फारसा परिणाम झाला नाही. त्यामुळे नाशिकमध्ये झालेल्या विभागीय मेळाव्यात ‘नगरची जागा काँग्रेसकडेच’ असल्याचे मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट करवून घेण्यात स्थानिक काँग्रेस पदाधिकारी यशस्वी ठरले. काँग्रेसच्या स्थानिक पदाधिका-यांना जागेच्या अदलाबदलीची व स्वपक्षातीलच बाहेरचा उमेदवार लादला जाण्याची भीती आहे. जिल्हा परिषद सदस्य सत्यजित तांबे यांनी नगरच्या जागेवरून लढण्याबाबत चाचपणी सुरू केली आहे. शहरात जनजागृतीपर झळकणारे फलक त्याचाच एक भाग होता. बाहेरचा उमेदवार लादला, तर त्याचा पराभव होईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांना देत स्थानिक पदाधिका-यांनी अप्रत्यक्षपणे संबंधित उमेदवाराचे काम करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

नगर महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. राष्ट्रवादीचे 18, तर काँग्रेसचे 11 नगरसेवक आहेत. वाढत्या बळाचा हवाला देत नगरची जागा राष्ट्रवादीला मिळावी, यासाठी श्रेष्ठींकडे स्थानिक पदाधिका-यांचा आग्रह सुरू आहे. काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारीही ही जागा राष्ट्रवादीला सोडण्यास कडाडून विरोध करत आहेत. काँग्रेसच्या पदाधिका-यांच्या उपस्थितीत आतापर्यंत झालेल्या बैठकांमधून जागा वाचवण्याचा सूर उमटला आहे.

सर्वानुमते निर्णय होईल
विधानसभेची नगर शहर मतदारसंघाची जागा लढवण्याबाबत कार्यकर्ते व पदाधिका-यांचा आग्रह आहे. पक्षाच्या नगरसेवकांनी तसा ठराव करून पक्षश्रेष्ठींकडे पाठवला आहे. महापौर पदाच्या माध्यमातून घराघरात पोहोचण्यात यश आले. मात्र, निवडणूक लढवण्याबाबत सर्वानुमते होणारा निर्णय अंमलात येईल. संग्राम जगताप, महापौर.

जागा काँग्रेसकडेच
श्रीगोंदे मतदारसंघात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे पूर्वी ही जागा राष्ट्रवादीला दिली होती. श्रीगोंद्याचा तिढा सुटला तेव्हाच नगरची जागा काँग्रेसकडे आली. ही जागा बदलून देण्याचा प्रश्नच येत नाही. मुख्यमंत्र्यांनीच हे स्पष्ट केले आहे. तसेच स्थानिक उमेदवार देण्याचा शब्दही त्यांनी दिला असून पक्षाचाच उमेदवार लढेल. ब्रिजलाल सारडा, शहर जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.

सर्वांच्या एकीचा फायदा आघाडीच्या उमेदवाराला मिळेल
माजी नगराध्यक्ष शंकरराव घुले, आमदार अरुण जगताप व माझ्यात असलेल्या वादाचा फटका यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये बसला आहे. आता सर्वच नेत्यांचे एकमत असून पक्षाकडे महापौरांसारखा सक्षम उमेदवार आहे. काँगे्रसही आम्हाला साथ देईल, ही अपेक्षा आहे. गेल्या 25 वर्षांपासून दुहीचा फायदा घेत शिवसेनेचा उमेदवार निवडून येतो. यावेळी हे चित्र बदलण्याचा प्रयत्न असून राष्ट्रवादीसाठी जागा मिळावी, असा आमचा आग्रह आहे. शहराचा विकास नसल्याने जनतेत नाराजी आहे. सक्षम पर्यायाअभावी ही नाराजी व्यक्त झालेली नाही. तो पर्याय देण्याचा प्रयत्न आहे. दादा कळमकर, प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी.