आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणधुमाळी - जागावाटपाचा तिढा कधी एकदाचा सुटणार?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या, तरीही शिवसेना-भाजप महायुती व काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. परिणामी जिल्ह्यातील सर्वांचेच लक्ष मुंबईकडे लागले आहे.
जागावाटपाचा मुद्दा महायुती व आघाडीत कमालीचा ताणला जात असताना संभाव्य उमेदवारांची धाकधूकही वाढत आहे. आघाडीसोबतच महायुतीच्या जिल्ह्यातील काही जागांची अदलाबदल होण्याची शक्यता असल्याने हे चित्र स्पष्ट होण्याची प्रतीक्षा आहे.

जिल्ह्यात विधानसभेचे बारा मतदारसंघ आहेत. या सर्वच मतदारसंघात विद्यमान आमदार निवडणुकीच्या रिंगणात राहणार आहेत. गेल्या निवडणुकीत बारापैकी एकतृतीयांश म्हणजेच चार मतदारासंघांत राष्ट्रवादीने विजय मिळवला. त्याखालोखाल शिवसेना व काँग्रेसने प्रत्येकी तीन जागांवर विजय मिळवला, तर दोन जागा जिंकत भाजप चौथ्या स्थानावर होता.

मतदारसंघ पुनर्रचनेनंतर पहिल्यांदाच २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीतून विधानसभेत पोहोचलेले जिल्ह्यातील पक्षीय बलाबल असे होते. तत्पूर्वीच्या २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीतही पक्षीय बलाबल २००९ प्रमाणेच होते. मतदारसंघ पुनर्रचनेत जिल्ह्यातील एक विधानसभा मतदारसंघ कमी झाला.

आचारसंहिता लागून तीन दिवस उलटले, तरी जिल्ह्यात सर्वत्र सामसूम आहे. केवळ नगर शहर मतदारसंघात शिवसेनेचे आमदार अनिल राठोड यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. शिवसेनेने विद्यमान आमदारांना उमेदवारी देण्याचे धोरण यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यानुसार शहरातून राठोड, पारनेरमधून विजय औटी व कोपरगावमधून अशोक काळे यांची उमेदवारी निश्चित आहे. विद्यमान आमदारांच्या उमेदवारीबाबत इतर कोणत्याही पक्षाने अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही. काँग्रेसच्या जिल्ह्यातील तीन आमदारांपैकी राधाकृष्ण विखे व बाळासाहेब थोरात यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपदे आहेत. या दोन मंत्र्यांसह राष्ट्रवादीचे मधुकर पिचड यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याचे कारण नाही.

नेवासे व शेवगावमधून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदारच पक्षाचे उमेदवार ठरणार आहेत. भाजपचेही राहुरी व कर्जत-जामखेड मतदारसंघातील आमदारांना यावेळची उमेदवारी निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहे.जागावाटपाबाबत युती व आघाडीच्या नेत्यांकडून अलीकडे टोकाच्या भूमिका मांडल्या जात आहेत. त्यामुळे जागावाटपाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शहरात आघाडीत बिघाडी
नगरच्या जागेसाठी काँग्रेसच्या सहा इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. याव्यतिरिक्त युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी उमेदवारीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली असून घरोघरी पत्रक व पोस्टकार्ड पाठवून त्यांनी शहर विकासाच्या योजना कळवण्याचे आवाहन करत भावनिक साद घालण्याचा प्रयत्न चालवला आहे. महापौर संग्राम जगताप यांनीही जोरदार तयारी सुरू केल्याने आघाडीतील बिघाडी पुढे येत आहे.

श्रीगोंद्यातही होणार पेच
श्रीगोंदे मतदारसंघ भाजपकडे असून माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र, महायुतीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने ही जागा मागितली आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांच्या उमेदवारीसाठी पक्ष आग्रही आहे, तर शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडेंनीही बंडखोरीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे श्रीगोंद्यात महायुतीसमोर पेच होणार आहे.