आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिक्युरिटी गार्ड ते चित्रपट निर्माता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरीला सुरुवात करणारे रामदास ससे आता चित्रपट निर्माते झाले आहेत. त्यांनी तयार केलेला ‘दहावीची ऐशी की तैशी’ चित्रपट 27 जूनला महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

नगर तालुक्यातील ससेवाडी येथील मजूर कुटुंबात रामदास यांचा जन्म झाला. वडील सालगडी होते, तर आई मोलमजुरी करत असे. हलाखीच्या दिवसांतही त्यांनी तीन मुलांना शिकवले. रामदास यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण ससेवाडीत, तर दहावीपर्यंतचे शिक्षण जेऊरमध्ये झाले. बारावीनंतर नोकरीचा शोध सुरू झाला. नोकरी मिळेना, म्हणून रस्ते, नालाबंडिंगच्या कामात मजूर म्हणून काम केले. आई म्हणायची पुढे शिक, त्याचा फायदा होईल. त्यावरून वाद होत. त्याला वैतागून 9 सप्टेंबर 1999 रोजी रामदास यांनी घर सोडले.

पुढच्या कालखंडाविषयी रामदास सांगतात, पुण्याजवळील सणसवाडीला मित्र होता. त्याच्याकडे निघालो, पण नेमके ठिकाण माहिती नव्हते. शिक्रापूरला उतरून पाच किलोमीटर पायी चालत सणसवाडीला गेलो. रात्री तिथल्या मंदिरात झोपलो. सकाळी मित्राचा शोध सुरू केला. दोन दिवस वडापाववर गुजराण केल्यानंतर मित्र भेटला. कमी शिक्षणामुळे नोकरी मिळेना. शेवटी चौथ्या दिवशी सिक्युरिटी गार्डची नोकरी मिळाली. घरचे घेण्यास आले, पण मोठा माणूस झाल्याशिवाय मी घरी येणार नाही, असे त्यांना सांगितले.

काही काळानंतर भारत सेल्युलरच्या नगरमधील शोरूममध्ये नियुक्ती झाली. माझ्या नम्र स्वभावामुळे कंपनीने मेंटेनन्स विभागात काम दिले. कंपनीच्या वरिष्ठांशी मैत्री झाली. नोकरीत चार पैसे मिळू लागले. माझी सचोटी पाहून वरिष्ठांनी छोटी काँट्रॅक्ट देण्यास सुरुवात केली. स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन दिले. सन 2009 मध्ये नोकरी सोडून व्यवसाय सुरू केला. कामे मिळत गेली. आता माझ्या दोन कंपन्या आहेत, असे ससे म्हणाले.
लोकांना शिक्षणाचे महत्त्व कळावे, म्हणून सामाजिक व शैक्षणिक विषयावरील ‘दहावीची ऐसी की तैसी’ हा चित्रपट तयार केला. तो 27 जूनला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात मोहन जोशी, प्रिया बर्डे, विजय पाटकर, हेमलता बाणे, विष्णू कांबळे यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण बनसोडे यांनी केले आहे. दुसरा चित्रपट स्त्री भ्रूणहत्येवर असून त्याचे चित्रीकरण आॅगस्टपासून सुरू होणार आहे, असे ससे यांनी सांगितले.
अण्णा उपस्थित राहणार
प्रणाली एन्टरप्रायझेसच्या ‘दहावीची ऐशी की तैशी’ या चित्रपटाचा प्रिमीयर 27 जूनला सकाळी साडेनऊ वाजता नगरच्या माय सिनेमा चित्रपटगृहात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, स्नेहालयाचे डॉ. गिरीश कुलकर्णी, शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या उपस्थितीत होत आहे.