आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेरण्यांना आला वेग; १३५ टँकर झाले बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- मागील गुरुवारपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर शुक्रवारी कमी झाला. समाधानकारक पाऊस झाल्याने ग्रामीण भागात रखडलेल्या पेरण्यांना वेग आला आहे. संततधार पावसामु‌ळे जिल्ह्यातील तब्बल १३५ टँकर बंद झाले आहेत. दरम्यान, पावसामुळे ग्रामीण भागात साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे.
पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्यामुळे धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून पेरण्यांना वेग आला आहे. शुक्रवार अखेरपर्यंत नगर ३१६, अकोले ५६८, संगमनेर ३२०, कोपरगाव २२२, श्रीरामपूर २६७, राहुरी २६३, नेवासे १९२, राहाता २७८, शेवगाव २५५, पाथर्डी ३१४, पारनेर १०९, कर्जत २०४, श्रीगोंदे १५८ व जामखेडमध्ये २७७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यात गेल्या वर्षी या कालावधीत सरासरी ३३१ मिलिमीटर पाऊस झाला होता.यंदा २८२.५३ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
पावसामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई कमी झाल्याने जिल्ह्यातील टँकरची संख्या घटली आहे. आठ िदवसांपूर्वी िजल्ह्यात ३३० टँकर सुरू होते. आता त्यातील १३४ टँकर बंद झाले आहेत. िजल्ह्यात अजूनही ४ लाखांहून अिधक नागरिक टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. सततच्या पावसामुळे हवामाना बदलामुळे साथीच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नगर शहरात काविळीचे रुग्ण आढळून येत असतानाच ग्रामीण भागात मलेिरया, डेंग्यू व तापाचे रुग्ण वाढले आहेत. विषाणूजन्य आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असल्याने जिल्हा रुग्णालय प्रशासनाने संबंधित भागात तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गेल्या तीन महिन्यांत डेंग्यूची २० जणांना लागण झाली. ४० जणांना विषाणूजन्य आजारांची, १२ जणांना गोवरची, १८ जणांना हीवताप व २५ जणांना चिकुनगुन्याची लागण झाली आहे. गेल्या महिन्यात २ हजार ३३० पाण्याचे नमुने तपासण्यात आले होते. त्यापैकी ४२३ नमुने दूिषत आढळले अाहेत.

पाच तालुक्यांत पाऊस थांबला, अन्यत्र तुरळक सरी
जिल्‍ह्यातील संगमनेर, राहाता, नगर, कर्जत व जामखेड तालुक्यात पाऊस थांबला आहे. कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, नेवासे, शेवगाव, पारनेर व श्रीगोंदे तालुक्यात मात्र तुरळक पाऊस सुरू आहे. गेल्या २४ तासांत अकोले ७, कोपरगाव २, श्रीरामपूर, २ राहुरी १३, नेवासे ४, शेवगाव २ व पारनेरमध्ये ३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.