आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीना नदीचा श्वास मोकळा होणार का? बांधकाम व्यावसायिकांची नदीपात्रात अतिक्रमणे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - सीना नदीतील अतिक्रमणांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शनिवारी याबाबत आमदार संग्राम जगताप जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ११ पासून ही अतिक्रमणे काढण्याचे ठरले असले, तरी पात्रात असलेले मातीचे भराव काढून नदी मोकळी करण्याची हिंमत इच्छाशक्ती संबंधित यंत्रणांकडे आहे का?, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
अनेक वर्षांपासून सीना नदीत अतिक्रमणे होत आहेत. अतिक्रमणे करणाऱ्यांमध्ये शहरातील वजनदार मंडळी बांधकाम व्यावसायिकांचा समावेश आहे. अतिक्रमणे करताना या मंडळींनी महसूलच्या गाळपेराच्या जमिनीबाबतच्या नियमाचा गैरफायदा घेतला. नियमानुसार नदीकाठापलीकडे जमीन असलेल्या शेतकऱ्यास गाळपेराची जमीन कसण्यासाठी महसूल विभाग परवानगी देतो. अशी परवानगी घेऊन सरळ बांधकामे करण्यात आली. पूररेषेपासून पन्नास मीटरपर्यंत बांधकामे करता येत नाहीत. अद्याप सीनेची पूररेषाच निश्चित नसल्याने पात्रात बांधकामे करण्यात आली.

आज सीनेच्या पात्रात वीटभट्ट्या, स्मशानभूमी, मंगल कार्यालये, वसाहती असे सर्व काही आहे. अमरधाममागील नदीचे पात्र वसाहती यांच्यातील सीमारेषा अतिशय पुसट आहे. येथे ही गटारीसारखी क्षीण धारेने वाहणारी नदी वगळता प्रामुख्याने वीटभट्ट्या, सिमेंटचे ब्लॉक तयार करण्याचे कारखाने, रद्दी भंगारचा डेपो दिसतो. बागरोजा हडको वसाहतीच्या मागे, तर नदीचे पात्र अतिक्रमणांमुळे इतके अरुंद झाले आहे, की येथे नदी आहे यावर विश्वास ठेवणे कठीण जाते.
स्टेशन रस्त्यावरील लोखंडी पुलाच्या परिसरात पात्रात वीटभट्ट्यांचे जाळेच पसरले आहे. पुलाच्या डावीकडे त्यावेळच्या नगरपालिकेने चक्क स्मशानभूमी बांधली आहे. काही वर्षांपूर्वी ती पुराच्या पाण्याखाली गेली होती. वीटभट्ट्यांबाबत अनेकदा ओरड होऊनही काहीच कारवाई झालेली नाही.सीनेतील अतिक्रमणांचा सर्वात गंभीर प्रश्न नगर-पुणे रस्त्यावरील पुलाच्या परिसरातील आहे. या भागात जमिनीला मोठी मागणी असल्याने संबंधित यंत्रणांनी सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने नदीपात्रात मोठमोठे भराव घालण्यात येत आहेत. हे भराव रात्रीच्या वेळी घातले गेले. सध्याही लोखंडी पुलाच्या परिसरात रात्रीच्या वेळी असे भराव घालण्याचे काम सुरू असल्याची माहिती परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी दिली. शहराच्या बाजूने डाव्या बाजूस बांधकाम साहित्य विकणाऱ्या एका व्यावसायिकाचा भराव पुलाच्या थेट सहाव्या मोरीपर्यंत पात्रात घुसला आहे. ज्यावेळी नदीला पाणी येते, तेव्हा या भरावाचा अडथळा होऊन ते पाणी समोरच्या वसाहतींत घुसते. याबाबत अनेकदा आवाज उठवूनही काहीच कारवाई झाल्याची तक्रार वसाहतीतील नागरिकाने ‘दिव्य मराठी’शी बोलताना केली. पूल खूप जुना आहे. तो काय विनाकारण जास्त मोऱ्यांचा बांधला होता का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. पात्राच्या पलीकडील बाजूसही तीच परिस्थिती आहे. पुलाच्या उजव्या बाजूला फरशी विक्रेता त्यानंतर एका बड्या बांधकाम व्यावसायिकाचे भराव आहेत. नदीची गाळपेर जमीन कसण्यासाठी म्हणून घ्यायची, त्यावर बांधकामे करायची, हळूहळू पात्रात भराव टाकायचे, त्यांचे सपाटीकरण करायचे, अशी अतिक्रमण करणाऱ्यांच्या कामाची पद्धत आहे. पुलाच्या उजव्या बाजूने रेल्वेपुलाच्या बाजूने जो भराव आहे, त्याने पुलाच्या पाच मोऱ्या बुजल्या होत्या. याबाबत ओरड झाल्यानंतर आता फक्त मोऱ्या मोकळ्या करण्यात आल्या आहेत. मात्र, पुढे भरावाची रुंदी तितकीच आहे.

पात्राच्या मोजणीनंतर हद्द निश्चित करणार
आमदारसंग्राम जगताप यांनी सीनापात्राची हद्द निश्चित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी कवडे यांनी यासंदर्भात बैठक घेत सीनापात्रासह खोकरनाला भिंगारनाला पात्राची मोजणी करून हद्द निश्चित करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. पात्राची हद्द निश्चित झाल्यानंतर ११ जुलैपासून अतिक्रमण काढण्यासाठी संयुक्तपणे मोहीम सुरू करण्यात येणार आहे. ही मोहीम प्रभावीपणे राबवण्याची गरज आहे.

सरकारी यंत्रणा अजूनही झोपेत
मुंबईत मिठी नदीच्या पुराने हाहाकार उडाल्यानंतर सरकारी यंत्रणा जाग्या झाल्या. येथेही अशी घटना घडण्याची वाट सरकारी यंत्रणा पहात आहेत का, असा नागरिकांचा प्रश्न आहे. सीना नदी गिळंकृत करणाऱ्यांत राजकीय नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे सीना नदीतील अतिक्रमणांकडे महापालिकेसह जिल्हा प्रशासनाचे, तसेच सर्वच सरकारी यंत्रणांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस भराव टाकून अतिक्रमण करणाऱ्यांचे चांगलेच फावते आहे.

शंभर मीटर रुंदीचे पात्र कोठे गेले?
पाटबंधारे विभागाकडील एका नकाशातील प्रमाणानुसार या पुलाजवळ नदीचे पात्र शंभर मीटर रुंद असायला हवे. आता येथील पूलही शंभर मीटर लांबीचा राहिलेला नाही. नदीत इतक्या वेगाने भराव टाकले, गेले तर कालांतराने या नदीचे अस्तित्वच संपण्याची भीती आहे. अतिक्रमणे करणारे लोक ‘वजनदार’ असल्याने त्यांच्यावर कारवाई होऊ शकलेली नाही, ही वस्तुस्थिती सर्वच मान्य करतात.
बातम्या आणखी आहेत...