आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sena Members Come And MNS Stopped Its Street Drama

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेनेचे कार्यकर्ते येताच ‘मनविसे’च्या पथनाट्याचा ‘पोपट’ !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शहरातील कायदा सुव्यवस्था व रखडलेली विकासकामे याविषयी जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने पथनाट्य मोहिम सुरू आहे. मात्र, दुसर्‍याच दिवशी गुरुवारी नेता सुभाष चौकात हे पथनाट्य सुरु असताना शिवसेनेच्या युवा सेनेचे कार्यकर्ते तेथे आले. त्यामुळे कलाकारांनी आपले पथनाट्य मध्येच बंद केले. मनविसे व युवा सेना पदाधिकार्‍यांमध्ये बोलणी सुरु असताना कलाकारांनी मात्र मैदान सोडले. त्यामुळे मनविसेच्या पथनाट्याचा ‘पोपट’ झाला.

नगरकरांना भेडसावणार्‍या महत्वपूर्ण प्रश्नांकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनविसेतर्फे पथनाट्य सादर केले जात आहे. बुधवारी कापड बाजारात पहिले पथनाट्य झाले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. मनविसेच्या सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष जालिंदर शिंदे, प्रशांत टेमक यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सादर होत आहे. लोकप्रतिनिधींना शहरातील प्रश्नांचा विसर पडला असून रस्ते, वीज, पाणी, महिलांची छेडछाड, यामुळे नगरकर हैराण झाले आहेत. त्यावर ‘मनसे’ हाच पर्याय असल्याचे या पथनाट्यातून सांगितले जात आहे.

गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास चितळे रोडवरील नेता सुभाष चौकात पथनाट्य सादर करायला कलाकार आले. मनविसेचे शहराध्यक्ष सुमित वर्मा, ज्येष्ठ नेते वसंत लोढा व इतर कार्यकर्ते तेथे होते. पथनाट्य सुरु होताच युवा सेनेचे विक्रम राठोड कार्यकर्त्यांसह तेथे आले. त्यांना पाहून कलाकारांनी पथनाट्य थांबवले. नंतर लोढा हाईट्ससमोर पथनाट्य सादर करण्याचे ठरले. तेथेही राठोड आले. त्यामुळे कलाकारांनी पथनाट्य पुन्हा बंद केले. यावेळी मनसे पदाधिकारी व राठोड यांच्यात शाब्दिक जुगलबंदी रंगली. एकीकडे ही जुगलबंदी सुरु असताना पथनाट्यातील कलाकारांनी मात्र काढता पाय घेतला. त्यामुळे नागरिकांची मात्र करमणूक झाली. मनसे पदाधिकारीही निघून गेले. तीन दिवस हे पथनाट्य सुरु राहणार असल्याचे आधी सांगण्यात आले होते. परंतु आता ऐनवेळी कलाकारांना दुसरे काम निघाल्यामुळे शुक्रवारी पथनाट्य होणार नसल्याचे मनविसेच्या वतीने सांगण्यात आले.


भयमुक्तीचा नारा देणारेच घालताहेत भीती
नेता सुभाष चौकात युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी दमदाटी करीत पथनाट्य बंद पाडले. त्यामुळे कलाकार विद्यार्थी घाबरुन निघून गेले. त्यांनी आधी पथनाट्य बघून नंतर प्रतिक्रिया देणे अपेक्षित होते. पण, ‘भयमुक्त नगर’ असा नारा देणारेच या शहरात भयावह वातावरण निर्माण करीत असल्याचे यावरून सिद्ध झाले.’’ सुमित वर्मा, शहराध्यक्ष, मनविसे.


आता सगळ्यांचीच नाटके सुरु होतील
आम्ही आमच्या गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाचे काम पहायला गेलो होतो. तर तेथे नाटक सुरु असल्याचे समजले. आजवर आम्ही शहराचा विकास केला म्हणूनच जनतेने 25 वर्षे आम्हाला साथ दिलेली आहे. पण आता निवडणुका आल्यामुळे सर्वांचीच ‘नाटके’ सुरु होतील. अशी नाटके करीत राजकारण करण्यापेक्षा त्यांनी नागरिकांच्या समस्या समजून घ्याव्यात.’’ विक्रम राठोड, युवा सेना