आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधकांचे राजकीय अस्तित्व संपणार: लांडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी- डोंगराळ भागात पाणी आणू, शंभर हायस्कूल सुरू करू, टाकळीमानूरपर्यंत जायकवाडीचे पाणी देऊ, म्हणणारे लोकप्रतिनिधी आता पैशाची भाषा बोलत असले, तरी महिलेच्या हाताने त्यांचा (आमदार घुले) पराभव निश्चित असून 19 तारखेला मोनिका राजळे यांचे मतािधक्य पाहून आमच्या विरोधकांचे राजकीय अस्तित्व कायमचे संपणार आहे, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप लांडे यांनी केली.
भाजपच्या उमेदवार राजळे यांच्या प्रचारार्थ तालुक्यातील डोंगरगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर मोनिका राजळे, जिल्हा परिषद सदस्य योगिता राजळे, अ‍ॅड. दिनकर पालवे, माजी सदस्य शिवशंकर राजळे, जिल्हा परिषद सदस्य संभाजी दहातोंडे उपस्थित होते.
लांडे म्हणाले, तुमचे काम चोख असेल, स्वच्छ चारित्र्य असेल, तर मतासाठी पैसे वाटण्याची गरज नाही. खोटे फोटो, खोट्या जाहिराती, कोरड्या बंधा-यांचे लोकार्पण सोहळे पाहून कंटाळा आला. जिल्ह्यातील पहिल्या महिला आमदार म्हणून मोनिका यांना विधानसभेत पाठवण्याची संधी चालून आली आहे. शेवगाव बाजार समितीत कापूस सेस पावत्यांमध्ये गैरप्रकार, "ज्ञानेश्वर'च्या उसाला इतरांपेक्षा कमी भाव करून शेतक-यांची पिळवणूक करणाऱ्यांना कायमचे घरी बसण्यासाठी मतदारांनी निर्णय घेतला आहे. माझ्या गाडीला रिव्हर्स गिअर नसल्याने कितीही आमिषे दाखवली, तरी माघारी फिरणार नाही. मोठा होऊ नये, स्पर्धक ठरू नये, म्हणून डाव करून मला जिल्हा परिषदेत पराभूत केले. त्याची परतफेड करण्याची संधी मी दवडणार नाही. गावावरून ओवाळून टाकलेले चार टाळके गाडीमागे पळवले म्हणजे नेता होत नाही. शेकडो पालकांना नोकरीच्या आमिषाने तुम्ही फसवले. पाथर्डीला भेटले म्हणजे शेवगावला या, तेथे आल्यावर भेंड्याला या तेथे भेट झाली, तर दहिगावला या. चुकून तेथे भेट झाली, तर मीटिंगला निघालो, पुढच्या वेळेस असे हेलपाटे मारून वैतागलेले पालक, तरुण वर्ग यांचा तळतळाट तुम्हाला गुलाल दिसू देणार नाही. सावांकडून सत्ता, सज्जनांकडून मते मिळवून संस्था चोरांच्या हातात दिल्या. दहिगावची इमारत 19 तारखेला ढासळेल कारण पायातील दगड (दिलीप लांडे) बाहेर पडला आहे. राजकारण करताना माणसाचा तोल जातो. शेवगाव - नेवासे, पाथर्डी - शेवगाव असा कोणताही मतदारसंघ असला, तरी शेवगाव प्रत्येक निवडणुकीत मीच सांभाळले आहे.