नगर- महाराष्ट्रातील पत्रकारिता कार्यकर्त्यांनी जन्माला घातली आहे. पत्रकार हा कार्यकर्ता असला पाहिजे. मात्र, सध्या कार्यकर्ता बदलत चालला आहे. पत्रकारांनी प्रस्थापित व्यवस्थेविरुध्द उभे राहिले पाहिजे, असे मत ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत प्रा. जयदेव डोळे यांनी बुधवारी (18 जून) व्यक्त केले. कॉम्रेड भास्करराव जाधव पत्रकारिता पुरस्कार प्रा. डोळे यांना ज्येष्ठ पत्रकार महावीर जोंधळे, माजी प्राचार्य ह. की. तोडमल, प्रतिष्ठानच्या सचिव नीलिमा बंडेलू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरुप होते. श्रमिक भवनात हा कार्यक्रम झाला.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रा. डोळे म्हणाले, माझे पहिले संपादक भास्कराव जाधव होते. ‘श्रमिक विचार’मुळेच मी वैचारिकदृष्ट्या पक्का झालो. माझ्यावर झालेली घडण ही श्रमिक विचारांची आहे. कार्यकर्ता व पत्रकार हे नाते जवळचे आहे. वैचारिक बांधिलकी पत्रकाराने जपली पाहिजे. महाराष्ट्राला लाभलेली ही फार मोठी परंपरा आहे. लोकशाहीचे दडपण पत्रकारांवर आहे. सध्याचे पत्रकार राजकीय पुढा-यांच्या वृत्तपत्रांत काम करतात. पत्रकारांनी पगार मालकांचा घ्यावा, पण सेवा मात्र सर्वसामान्यांची करावी.सल्ला देणे हे पत्रकाराचे काम नाही. सध्या पत्रकारिता सत्तेचे रूप धारण करत आहे. ही धोक्याची घंटा आहे. पत्रकारितेचा उपयोग सर्वसामान्यांसाठीच झाला पाहिजे. त्याने नेहमी तटस्थ असावे, असे प्रा. डोळे म्हणाले.
पेड न्यूजबाबत ते म्हणाले, पत्रकार विकत घेणे म्हणजे लोकशाही विकत घेण्यासारखे आहे. काही तत्त्वनिष्ठ पत्रकारांमुळे पत्रकारिता टिकली आहे. वाचकांच्या नजरेतून पत्रकाराने उतरू नये. पत्रकाराने नेहमी कार्यकर्ता म्हणून काम करावे. भास्करराव जाधव यांच्या नावाचा हा पुरस्कार मिळाला ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे, असे ते म्हणाले. यावेळी जोंधळे, डॉ. तोडमल, कॉम्रेड विजय कुलकर्णी यांचीही भाषणे झाली. आनंदराव वायकर, अनंत लोखंडे, ज्येष्ठ पत्रकार महादेव कुलकर्णी, प्रा. प्रियदर्शन बंडेलू आदी यावेळी उपस्थित होते.