आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Senior Leaders Babanrao Pachpute, Latest News In Divya Marathi

बबनराव पाचपुते पक्षात आल्यास ‘शाई फेक’, संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चेने निष्ठावंत नेत्यांचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- माजी मंत्री व ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते यांच्या संभाव्य प्रवेशाच्या चर्चेने भाजपमधील दुस-या फळीतील निष्ठावंत नेत्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता झाली आहे. पाचपुते पक्षात आले, तर त्यांच्यावर शाई फेक आंदोलन करू. तसेच या पुढे ‘आयाराम-गयारामांचे’ काम न करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

भाजपही आता ‘आयाराम-गयाराम’चा पक्ष बनल्याची त्यांची भावना बनली असून या विरोधात जिल्ह्यातील दुस-या फळीतील नेते एकत्र येऊन या विरोधात एल्गार सुरू करणार आहेत. आधी पक्षश्रेष्ठींकडे निषेध व्यक्त करणार आहेत. त्यांनी जर त्याकडे दुर्लक्ष केले, तर अशा नेत्यांचे काम न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एका असंतुष्ट नेत्याने ‘दिव्य मराठी’शी संपर्क साधून दिली.
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता येणार याची खात्री असल्याने आपल्या अगोदरच्या ‘उद्योगांवर’ पांघरुण घालण्यासाठी व मलई खाण्यासाठी ते भाजपमध्ये येत आहेत, अशी कडवट टीका यांनी केली. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यावरही पाचपुते यांनी आरोप केले होते. आता ते विसरले असले, तरी आम्ही विसरलो नाही. तीस-तीस वर्षे भाजपचे कार्यकर्ते संघर्ष करत आहेत. पाचपुतेंना इतकी वर्षे भाजप का आठवला नाही?, त्यांना पक्षात घेऊ नये यासाठी भाजप युवा मोर्चातर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देणार असल्याची माहिती त्या नेत्याने दिली.

पाचपुते यांच्या राजकीय निर्णयाने जिल्ह्यात खळबळ उडवली आहे. मध्यंतरी पक्ष सोडण्याबाबत त्यांच्या कार्यकर्त्यांनी माध्यमांशी संपर्क साधून खळबळ उडवून दिली होती. त्यानंतरच जिल्ह्यात राजकीय खलबतांना ऊत आला. आपल्या पक्षत्यागाच्या घोषणेला त्यांनी 15 आॅगस्टचा मुहूर्त साधला. त्यानंतर लगोलग त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला जोरदार सुरुवात झाली. पाचपुतेंनी अद्याप राजकीय वाटचाल स्पष्ट केली नसली, तरी सोमवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यामुळे भाजपमधील दुस-या फळीतील नेत्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. त्यात निष्ठेने गेली 30 वर्षे काम करणारेही आहेत. सध्या थेट पुढे येऊन काही बोलण्याची त्यांची मानसिकता नाही. मात्र, दोन-तीन दिवसांत सर्व असंतुष्ट नेते एकत्र येऊन बैठक घेणार आहेत. त्यात पुढील रणनीती ठरणार आहे. त्यात प्रामुख्याने अशा नेत्यांचे आम्ही काम करणार नाही, असा इशाराच वरिष्ठ नेत्यांना देण्यात येणार असल्याची माहिती समजली.

शिवाजी कर्डिले यांच्यानंतर आता बबनराव पाचपुते!
आधी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेल्या निवडणुकीच्या वेळी शिवाजी कर्डिले आले. आता त्यांनी पक्ष संघटनेवर पूर्णपणे कब्जा केला आहे. सत्तेच्या वर्तुळात फक्त आपण व आपले नातेवाईक (जावई व व्याही) असावेत, या त्यांच्या हट्टापायी अनेक वर्षे निष्ठेने काम करूनही आम्हाला दूर सारण्यात आले. आता ते आमदार, त्यांचे एक जावई महापौर, मुलगी उपमहापौर, आता त्यांचे चिरंजीव विद्यापीठ प्रतिनिधी. पक्षाचा कोणताही कार्यक्रम असला, की त्यांच्यासाठी व्यासपीठावर स्वतंत्र खुर्ची असते. जुने निष्ठावान कार्यकर्ते मात्र खाली सतरंजीवर बसलेले असतात. कर्डिले पुत्राचे कोणते कर्तृत्व सिद्ध झाले आहे, की ज्यामुळे त्यांना असे स्थान मिळते? मुळात पक्षासाठी कर्डिलेंनीच काय काम केले? उलट जावयाला महापौर करण्यासाठी त्यांनी शहरात चुकीच्या लोकांना उमेदवारी देऊन त्यांनी पक्षाची हातातोंडाशी आलेली सत्ता राष्ट्रवादीच्या घशात घातली, असे स्पष्ट करून भाजपच्या दुस-या फळीतील नेत्याने, आता पाचपुते येतील. त्यांचा स्वत:चा कार्यकर्त्यांचा संच आहे. ते त्यांचेच कल्याण पाहणार. अशा संधीसाधू नेत्यांची आम्ही कायम गुलामीच करायची का, असा सवाल उपस्थित केला.
आंदोलने आमची; मलिदा त्यांना
आम्ही वर्षानुवर्षे विविध प्रश्नांवर पक्षाच्या झेंड्याखाली आंदोलने करायची, त्यासाठी पोलिसी कारवाईला सामोरे जायचे, वर्षानुवर्षे न्यायालयीन खटल्यांना तोंड द्यायचे. मात्र ऐनवेळी राजकीय सोयीसाठी बाहेरच्या पक्षातील नेत्याने येथे येऊन ऐनवेळी आमच्या पुण्याईवर मलिदा खायचा, असे किती काळ चालणार, असा सवाल हे नेते उपस्थित करत आहेत.