आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Senior Leaders Babanrao Pachpute,Latest News In Divya Marathi

सहा निशाण्यांवर सात विधानसभा: नवा पक्ष, नवे चिन्ह ही तर पाचपुतेंची खासियत!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे- नवा पक्ष, नवे चिन्ह अन् नवा गॉडफादर ही तर आमदार बबनराव पाचपुतेंची राजकीय खासियत झाली आहे. 1980 पासून ते सहा चिन्हांवर सात विधानसभा लढले. आता आठव्या निवडणुकीत सातवे नवे चिन्ह घेतले, तर तो नवा विक्रम ठरेल.
1980 मध्ये सर्वात तरुण आमदार म्हणून पाचपुतेंची राज्यात ओळख झाली. समाजवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांनी राजकारणात आणलेला हा लाडका शिष्य त्यांच्यापुढे कधी निघून गेला हे सप्तर्षींनाही कळाले नाही. डॉ. सप्तर्षी हे पाचपुतेंचे पहिले गॉडफादर 35 वर्षांच्या राजकीय प्रवासात पाचपुतेंनी किमान डझनभर तरी गॉडफादर बदलले. मतदारसंघावर असलेली पकड अन् लोकसंग्रहांच्या बळावर त्यांना 35 वर्षांत एक अपवाद वगळता विधानसभेला सलग यश मिळत गेले.
पहिली निवडणूक अपक्ष म्हणून ते 1980 ला लढले. 1885 ला ते जनता पक्षाच्या नांगरधारी माणूस चिन्हांवर उभे राहिले व निवडून आले. पुढच्या निवडणुकीत ते जनता दलाच्या चक्र चिन्हावर, 1990 ला मैदानात उतरले. आठशे मतांनी बाजी मारत त्यांनी चक्रव्यूह भेदला. 1995 मध्ये काँग्रेसतर्फे ते चौथ्यांदा आमदार झाले. 1999 मध्ये ते राष्ट्रवादीचे उमेदवार होते. मात्र त्यांचे राजकीय घड्याळ बिघडले व काटे उलटे फिरले. प्रथमच अपयश पाहिलेल्या पाचपुतेंना हा मोठा धक्का होता. ते 2004 मध्ये पुन्हा मैदानात उतरले. काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीने श्रीगोंदे मतदारसंघ काँग्रेसला दिल्याने राष्ट्रवादीच्या पाचपुतेंनी बंडाचे निशाण फडकावत अपक्ष उमेदवारी दाखल केली. काँग्रेसच्या शिवाजीराव नागवडेंचा पराभव केला. 2009 मध्ये ते राष्ट्रवादीचे उमेदवार होते. आयुष्यात त्यांनी घड्याळ चिन्हावर पहिले यश मिळवले. आता 2014 चे पडघम वाजू लागताच बंडाचा झेंडा फडकावत पाचपुते पुन्हा एकदा नवा पक्ष व नवे चिन्हांची परंपरा पुढे नेण्याच्या प्रयत्नात आहेत. कट्टर धर्मनिरपेक्ष असलेले पाचपुते आता उजव्या विचारसरणीला कवटाळू पाहत आहेत.
राजकारणात त्यांनी जसा नवा पक्ष व नवे चिन्ह हे वेगळेपण उभे केले तसेच नवा गॉडफादर हे देखील पाचपुतेंचे वेगळेपण म्हणावे लागेल. सर्वप्रथम डॉ. कुमार सप्तर्षी त्यांचे गॉडफादर होते. पुढे ते माजी खासदार संभाजीराव काकडेंच्या गोटात गेले. त्याचवेळी त्यांनी प्रा. मधू दंडवते, निहाल अहमद, राजारम बापू पाटील यांच्याशी जवळीक साधली. यातून त्यांचा माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्याशी निकट संबंध आला. या सर्व गॉडफादरला क्रमाक्रमाने त्यांनी बाजूला केले. 1991 मध्ये नऊ आमदारांसह त्यांनी जनता दलाला खिंडार पाडले. वेगळा गट स्थापन केला व काठावर बहुमत असलेल्या सुधाकर नाईकांचे सरकार तारले. त्याची बक्षिसी मिळून पाचपुते प्रथमच राज्यमंत्री झाले. पुलोद आघाडीच्या रूपाने त्यांचा शरद पवारांशी संबंध आला होता, मात्र त्यांना पाचपुतेंनी गॉडफादर मानले नव्हते. नाईकांची सद्दी संपताच पाचपुतेंनी पवारांना गॉडफादर केले. त्यामुळे 1999 ला पराभूत झाल्यावरही पाचपुतेंना राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची बक्षिसी मिळाली होती. एकाकी पाचपुते आता नव्या ‘पांडूरंगां’च्या शोधात निघालेत. कदाचित त्यांना नव्या रूपात एखादा पांडूरंग भेटेल का?