आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Senior Social Worker Anna Hazare, Latest News In Divya Marathi

आमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करा, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले आवाहन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- देशाच्या स्वातंत्र्यासाठी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्यासारख्या लाखो स्वातंत्र्यवीरांनी बलिदान दिले आहे. त्यामुळे योग्य उमेदवारालाच निवडून द्या, आमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करा, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले.
राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. लोकशाहीत मतदारांची भूमिका महत्त्वाची असते. विधानसभा व लोकसभा ही लोकशाहीची पवित्र मंदिरे आहेत. या मंदिरात सामाजिक व राष्ट्रीय दृष्टिकोन असलेले स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार कसे जातील ते मतदारांच्या हातात आहे. त्यासाठी मतदारांनी जागरूक राहायला हवे, पाचशे-हजार रुपयांची नोट किंवा दारूच्या बाटलीला बळी पडून आपले अमूल्य मत विकू नका, त्यासाठी भारतमातेची शपथ घेऊन "मी आमिषाला बळी पडणार नाही, योग्य उमेदवारालाच मत देईन,' अशी प्रतिज्ञा करण्याचे आवाहन हजारे यांनी केले. राज्याची अनेक वर्षांची अवस्था पाहिली तर सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचार सुरू आहे. सामान्य माणसाला जगणे कठीण झाले आहे. वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांची नावे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गुंतली आहेत. अशा वेळी कोणता उमेदवार निष्कलंक व भ्रष्टाचाररहित आहे याचा मतदारांनी विचार केला तरच योग्य उमेदवाराची निवड होईल, असे आवाहन हजारे यांनी केले आहे. पारनेर मतदारसंघात अनेक उमेदवार नशीब आजमावत आहेत. मात्र, दुर्दैवाने या मतदारसंघातील उमेदवार विकासाच्या मुद्द्यांवर बोलण्याऐवजी एकमेकांवर चिखलफेक करत आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब होत आहे. पारनेर तालुका हा सेनापती बापटांसारख्या क्रांतिकारक देशभक्तांचा तालुका आहे. तालुक्याला प्रभावी असा इतिहास आहे. त्यामुळे मतदारांची जबाबदारी वाढली आहे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करा, असे आवाहन हजारे यांनी केले.