आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Separate Vidarbha Latest News On Political Party's View

वेगळ्या विदर्भावरून काँग्रेस-महायुतीत दुफळी; शिवसेना-भाजपमध्येही मतभिन्नता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी/पंढरपूर/मुंबई - आंध्रातील जनतेसह स्वपक्षीयांचाही विरोध झुगारून स्वतंत्र तेलंगणाची निर्मिती करणार्‍या कॉँग्रेसचा महाराष्ट्राच्या विभाजनाला मात्र तीव्र विरोध आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी वेगळ्या विदर्भाच्या निर्मितीला विरोधच असल्याचा पुनरुच्चार केला. दुसरीकडे, कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व विदर्भातील ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी मात्र आमचा पक्ष विदर्भाच्या मागणीला पाठिंबाच देईल, असा दावा केला आहे.
लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवान यांनी महाराष्ट्राचेही त्रिभाजन करण्याची मागणी संसदेत केली होती. बसपा अध्यक्षा मायावतींचाही वेगळ्या विदर्भाला पाठिंबा आहे. शुक्रवारी पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्रकारांनी विचारले असता, ‘महाराष्ट्रातील जनतेला काय हवे, याची रामविलास पासवान यांना काय माहिती असणार?’ असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी एकसंघ महाराष्ट्राचे सर्मथनच केले. दुसरीकडे, शिर्डीत साईंच्या दर्शनाला आलेल्या अशोक चव्हाण यांनीही मुख्यमंत्र्यांचीच री ओढली. संयुक्त महाराष्ट्रासाठी हजारो हुतात्म्यांनी बलिदान केले. त्यांचे बलिदान विसरता कामा नये. महाराष्ट्र हा एकसंघ राहावा, अशी आपली भूमिका असल्याचे चव्हाण म्हणाले.
रिपाइंचा पाठिंबा
महायुतीचाच घटक पक्ष असलेल्या रिपाइंचे नेते रामदास आठवलेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमीच विकासाच्या मुद्दय़ावर छोट्या राज्यांचे सर्मथन केले असल्याचे सांगत या मागणीसाठी 24 फेब्रुवारीला विदर्भात आंदोलनाची हाकही दिली आहे.
सत्तेत आल्यास वेगळा विदर्भ : भाजप
सत्तेत येण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी तर ‘आमचा पक्ष सत्तेत आल्यानंतर वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती करू’, अशी घोषणाच करून टाकली. वेगळ्या विदर्भाच्या निर्मितीसह देशभरात छोटी राज्ये निर्मितीच्या सर्मथनार्थ आम्ही यापूर्वीच ठराव मंजूर केलेला असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
वादग्रस्त विषय बाजूलाच ठेवा : शिवसेना
शिवसेनेने महाराष्ट्राच्या विभाजनाला सुरुवातीपासूनच विरोध केला आहे. मात्र आता निवडणुकीच्या तोंडावर हा विषय अधिक ताणू नये अशी अपेक्षा शिवसेनेने व्यक्त केली. खासदार संजय राऊत म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्रासाठी शिवसेना कटिबद्ध असून कोणत्याही परिस्थितीत राज्याचे विभाजन होऊ दिले जाणार नाही. महायुतीच्या भल्यासाठी विदर्भाचा मुद्दाही बाजूला ठेवणेच सोयीस्कर आहे.