संगमनेर - तमाशाच्या माध्यमातून रघुवीर खेडकरांनी संगमनेरचे नाव सर्वदूर नेले असले तरी काळाच्या आेघात या सांस्कृतिक क्षेत्रात आता अनेक बदल झाले. मात्र, आजही या क्षेत्रात लिलया वावरणाला कलाकार अशी वसंत बंदावणे यांची आेळख.
तमाशा, भारूड, नाटक, चित्रपट, शाहिरी अशा अनेक क्षेत्रात संगमनेरकर कलाकारांनी छाप पाडली आहे. राज्य नाट्य स्पर्धेमध्ये प्रथम दर्जाची पारितोषिके, पुरुषोत्तम करंडक मिळवणारेही संगमनेरकरच. सांस्कृतिक वैभव जपण्यासाठी बंदावणेसारखा कलाकार काम करतोय. या कलाकाराने लेखनापासून, तर कॅमेरामन, मेकअपमन, नेपथ्यकार, प्रकाश योजनाकार, अभिनेता, वक्ता, चित्रकार अशी सर्व क्षेत्र काबीज केली. आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या अधिपत्याखालील संग्राम संस्थेच्यावतीने डॉ. सोमनाथ मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदावणे यांनी चित्रपट निर्मितीचा प्रयत्न केला.
‘प्रायचित्त’ हा त्यांनी निर्माण केलेला पहिला चित्रपट. चित्रकला महाविद्यालय चालवताना एका गुन्ह्यात त्यांना कैदेच्या शिक्षेला सामोरे जावे लागले. येरवडा कारागृहात असताना त्यांना शिक्षकी पेशा स्वस्थ बसू देईना. स्वत:चे दु:ख विसरून अन्य कैद्यांसाठी त्यांनी कारागृहातच संस्कार वर्ग सुरू केला. कायद्याची जाण नसल्याने अनेक निरपराध लोक शिक्षा भोगत आहेत. ते गुन्हेगार नाहीत. कैद्यातील परोपकार, सज्जनपणा या भावना आजही टिकून आहेत ही बाब संस्कार वर्गादरम्यान त्यांच्या लक्षात आली. कारागृहात माणसे मनाने खचून जातात अशा स्थितीत त्यांनी कारागृहातील जीवनाकडे नवी संधी म्हणून बघत आपल्यातील कलाकार व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. शिक्षा भोगणाऱ्या अनेक कारागृह बंदींच्या त्यांनी मुलाखती घेतल्या, त्यावर कथा लिहिल्या. सुटका होताच त्यांनी या कथांच्या आधारे एका मालिकेची निर्मिती केली. कैद्यांच्या जीवनावरील निर्मिती असलेली बंदीशाळा ही मालिका दुसऱ्यांदा दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दर रविवारी प्रक्षेपित होत आहे. मालिकेतील संपूर्ण तंत्र आणि कलाकार संगमनेरचे आहेत.
अनेक स्थानिकांना संधी
आपल्या जीवनातील सर्व प्रवासात कलावंत असलेली पत्नी वंदना हिची साथ मिळाली. मुलगा आणि सूनदेखील चित्रपटसृष्टीत काम करत आहेत. या मालिकेद्वारे संगमनेरच्या इतिहासात प्रथमच एवढ्या कलाकारांना काम करण्याची संधी मिळाली. हा येथील सांस्कृतिक क्षेत्रासाठी विक्रम आहे. वसंत बंदावणे, निर्माता, बंदीशाळा मालिका.